मुंबई | मुंबई, पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. या सर्वांच्या घरवापसीसाठी तब्बल १० हजार एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही सेवा मोफत देण्यात येणार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.
लाँकडाऊन व संचारबंदीमुळे अनेक लोक घरापासून दूरवर अन्य जिल्ह्यात वा शहरात वेगवेगळ्या कारणांनी अडकले आहेत. यात विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गेलेल्या लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यातही मुंबई, पुण्यासारख्या महानगरांत हजारोंच्या संख्येने लोक अडकले आहेत. या सर्वांना त्यांच्या मूळगावी सोडण्यासाठी सरकारने एसटी बसेसची व्यवस्था केली आहे. पुढील चार ते पाच दिवसांत या सर्वांना त्यांच्या जिल्ह्यात सोडले जाणार आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
या सर्वांसाठी १० हजार एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रवासखर्चाचा हा भार मदत व पुनर्वसन विभाग उचलणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून केली जाणार आहे, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.लोकांना घरी सोडण्यासाठी लागणाऱ्या बसेस उपलब्ध करून देण्यास परिवहन मंत्र्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे यात आता कोणतीही आडकाठी नाही. सर्वांना सुरक्षितपणे घरी पोहचवण्याचा आमचा प्रयत्न राहिल,असेही वडेट्टीवार म्हणाले.