हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणावरून (Maratha Aarakshan) वाढलेला वाद हा आता इतर राज्यांना देखील सोसावा लागत आहेत. महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाच्या झळा ह्या आपल्या शेजारील राज्यावर पडताना दिसून येत आहेत. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बिदर मधील भालकी ते पुणे दरम्यान धावणाऱ्या बसला काल धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे आग लावण्यात आली. त्यामुळे कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसचे मोठे नुकसान झाले. राज्यातील एकूण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक परिवहन विभागाने (KSRTC) कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या ST बसेस बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मराठा आंदोलनामुळे राज्यात तणावपुर्ण परिस्थिती :
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरु असलेल्याआंदोलनामुळे तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यातील अनेक बस आगार बंद ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील बस सेवा बंद करण्यात आलेली आहे. हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात कर्नाटक परिवहन महामंडळाद्वारे चालवण्यात येणारी बस सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे.
दक्षिण महाराष्ट्रासाठी महत्वाची प्रवासी सेवा :
राज्यातील दक्षिण भागात व महत्वाच्या काही शहरांत कर्नाटक परिवहन महामंडळाद्वारे बसेस चालवण्यात येतात. यामधून मोठ्या संख्येने कर्नाटक व महाराष्ट्रतील प्रवासी प्रवास करत असतात. खास करून सोलापूर, सांगली, धाराशिव व लातूर जिल्ह्यातुन मोठ्या संख्येने लोक कर्नाटक राज्यात जात येत असतात त्यामुळे ही बस सेवा महत्वाची ठरते . परंतु मराठावाड्यातील काही जिल्ह्यात या आंदोलनास हिंसक स्वरूप मिळताना दिसून येत आहे. यामध्ये बसेस मोठे नुकसान होत आहे. यामुळे कर्नाटक परिवहन महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.