नांदेड : हॅलो महाराष्ट्र – एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत. या संपामुळे काही एसटी कर्मचाऱ्यांच्या घरात आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. याच हलाखीच्या परिस्थितीतून नांदेड जिल्ह्यात आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. पंधरा दिवसापूर्वी याच जिल्ह्यातील भीमराव सदावर्ते या एस टी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तसेच यापूर्वी साताऱ्यातील मेढा या ठिकाणच्या एका एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
मागच्या दोन दिवसांपासून नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मृत व्यक्तीचे नाव संभाजी गुट्टे असे असून ते कंधार आगारात चालक म्हणून कार्यरत होते. संभाजी गुट्टे हे देखील या आंदोलनात सक्रिय होते. मागील दोन महिन्यापासून पगार नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. गेल्या चार-पाच दिवसांपासून ते चिंतेत होते. यानंतर त्यांनी आपल्या शेतात जाऊन विष पिऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. संपूर्ण नांदेड जिल्ह्यात एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत.
एस टी महामंडळाचे शासनात विलीनीकरण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका नांदेडच्या एसटी कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली आहे. या आंदोलनामुळे सध्या संपूर्ण नांदेड जिल्ह्यात एसटी बस सेवा बंद आहे. देगलूर आणि कंधार आगारातून मात्र एक-एक बस धावत आहे. शिवाय लातूर-नांदेड ही एक बस सध्या लातूर आगारातून सुरू आहे. तरीदेखील एसटी संपाबाबात अजून कोणताच तोडगा निघाला नाही. या आंदोलनामुळे कित्येक एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. त्यातच आगारातील कर्मचाऱ्यांवर निलंबन आणि सेवा समाप्तीच्या कारवाया केल्या जात आहेत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवरील तणाव वाढला आहे. याच परिस्थितीतुन एसटी कर्मचारी आत्महत्या करण्यासारखे धक्कादायक पाऊल उचलत आहे.