अखेर कॉमेडीयन मुनव्वर फारुकीला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर; भाजप आमदार मुलाच्या तक्रारीवर झाली होती अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । हिंदू देवी-देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून गेल्या महिनाभरापासून तुरुंगात बंद असलेल्या स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याला अखेर सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. आरोपीला नियमांना धुडकावत अटक करण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला होता. या अगोदर मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं मुनव्वर फारुकी याला जामीन देण्यास नकार दिला होता. यानंतर मुनव्वर फारुकीने आजच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आज सर्वोच्च न्यायलयाने मुनव्वर फारुकीला जमीन मंजूर करत मध्य प्रदेश उच्च न्यायलयाच्या आदेशाची समीक्षा करण्यात करण्यात येणार असल्याचं म्हटलं. याशिवाय अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रोडक्शन वॉरंटलाही सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलीय. मुनव्वर फारुकीविरुद्ध इतर राज्यांत दाखल करण्यात आलेल्या खटले स्थगित करण्यात यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं नोटीस जारी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात मुनव्वर फारुकीनं एकूण दोन याचिका दाखल केल्या आहेत. एका याचिकेत जामिनावर मुक्ततेची विनंती करण्यात आलीय तर दुसऱ्या याचिकेत वेगवेगळ्या राज्यांत दाखल करणारे खटले एकाच ठिकाणी चालविण्यात यावेत, अशी मागणी मुनव्वरकडून करण्यात आलीय. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम जामीन देत नोटीस जारी केलीय. विवेक तंखा आणि अंशुमन श्रीवास्तव यांनी न्यायालयासमोर मुनव्वरची बाजू मांडली.

जवळपास महिन्याभरापूर्वी स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी यानं एका लाईव्ह शो दरम्यान हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याचा कथित आरोप भाजपकडून आणि हिंदुत्ववादी संघटनेकडून करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी मुनव्वर फारुकीला अटक केली होती. इंदूरमध्ये मुनव्वर फारुकी यानं हिंदू देवी-देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप स्थानिक भाजप आमदार मालिनी लक्ष्मणसिंह गौड यांचा मुलगा एकलव्य सिंह गौड यानं केला होता. मात्र, मुनव्वर फारुकी याच्याविरोधात कोणताही पुरावा आढळला नसल्याचं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलं होतं. मात्र, मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं मुनव्वर फारुकी याला जामीन देण्यास नकार दिला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

Leave a Comment