औरंगाबाद | सध्या पावसाळा सुरु झाला असून रस्तावरील खड्ड्यामध्ये पाणी साचते. ते पाणी घरात येऊ नये म्हणून दलालवाडीतील औषधीभवन येथील नाल्यावरील पुलाची उंची वाढवण्याचे काम सूरु होते. परंतु कंत्राटदाराने नाल्यातील कचरा न काढताच बांधकाम सुरू केल्यामुळे बांधकामास स्थगिती मिळाली आहे. त्याचबरोबर याप्रकरणी या कंत्राटदारावर कारवाई करण्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला होता. आता या नाल्यातील कचरा काढून पुलाचे काम आठ दिवसात सुरू करण्याचे आदेश आमदार प्रदीप जैस्वाल यांनी दिला आहे.
दलालवाडी भागात असलेल्या नाल्यामध्ये थर्माकोलचे तुकडे, औषधांचे बॉक्स, प्लास्टिक बॅग असा कचरा बऱ्याच वर्षापासून पडलेला आहे. पावसामुळे या भागात आणि नाल्यात भरपूर पाणी आणि कचरा पडून राहिल्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा उच्छाद वाढतो. त्याचबरोबर येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील गुलमंडी ते पैठणगेट हा रस्ता बंद असल्यामुळे नागरिकांना एकाच बाजूच्या रस्त्याने ये-जा करावी लागते. कोरोना महामारीमुळे बाजारपेठा सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू असतात. त्यामुळे गुलमंडी भागात मोठया प्रमाणात वाहन कोंडी होते. जर पैठणगेट दलालवाडी हा रस्ता सुरू झाल्यास वाहतूक कोंडी होणार नाही. यापार्श्वभूमीवर आठ दिवसात पुलाचे काम सुरु करण्याच्या सूचना आमदार प्रदीप जैस्वाल यांनी दिल्या आहे.
या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी प्रदीप जैस्वाल यांना त्यांच्या समस्या सांगितल्या. यावेळी महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता संजय काकडे, उपअभियंता नामदेव गाडेकर यांची उपस्थिती होती.