निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये किमान 50, तर कमाल 75 सदस्य संख्या ठेवण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयानंतर आता निवडणूक आयोगाकडून राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणुकांना आज स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती परिपत्रक काढून देण्यात आली.

शिंदे फडणवीस सरकारने महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेत बदल करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या बदलासंदर्भातील अध्यादेश 4 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला. दरम्यान जिल्हा परिषदेच्या सदस्यपदांच्या जागांच्या संख्येत बदल करण्यात आला असून, सध्याची मतदार विभाग आणि निर्वाचक गणांची रचना तसेच आरक्षणाची प्रक्रियादेखील स्थगित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या प्रक्रियेवर आणि आरक्षणाच्या प्रक्रियेवर दिलेल्या स्थगितीनंतर आता या निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहे.

आज राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना जाहीर करण्यात येणार होती. त्याचबरोबर जिल्हा परिषदांमधील जाहीर करण्यात येणार असलेली मतदार यादीची प्रक्रियाही स्थगित करण्यात आली आहे, असे परित्रकाद्वारे निवडणूक आयोगाने म्हटले. या संदर्भातील सूचना संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्यावतीने देण्यात आलेल्या आहेत.

निवडणूक आयोगाकडून ‘या’ जिल्ह्यातील जिल्ह्याधिकाऱ्यांना सूचना –

आज परिपत्रक काढून राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 25 जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना स्थगिती दिली आहे. त्यानुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया थांबवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.