धक्कादायक! उल्हासनगर मनपा सभागृहाच्या कार्यालयात अवैध दारूसाठा

प्रातिनिधिक छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी। उल्हासनगर महापालिकेची मालकी असलेल्या शहीद अरुण कुमार वैद्य सभागृहाच्या कार्यालयात अवैध दारूचा साठा असल्याची बाब स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिली. उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. ‘हा शहिदांचा अपमान’ असल्याचा आरोप मनसेने केला आहे. दरम्यान मनपा सभागृहाच्या कार्यालयात अवैध दारू साठयाची माहिती तातडीने त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीनुसार तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अवैध दारू साठा जप्त केला आहे. त्यासोबतच हा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवला जाणार असून जिल्हाधिकारी यावर योग्य ती कारवाई करतील अशी माहिती समोर येत आहे. मात्र, अशाप्रकारे एका मनपा प्रशासनाच्या मालकीच्या जागेत अवैध दारू साठा जप्त होणे ही बाब अनेक प्रश्न तयार करणारी आहे. नेमका हा प्रकार कोणाच्या वरदहस्ताने चालत होता? तसेच हा अवैध दारु साठा नेमका कशासाठी तेथे ठेवण्यात आला होता? हे प्रश्न अजून अनुत्तरीतच आहेत.