औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने आपल्याच आजी-माजी आमदारांना महाविद्यालयांची खैरात वाटल्याचे समोर आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 238 महाविद्यालयांचे प्रस्ताव यापूर्वी उधळून लावले होते. माञ विद्यापीठाच्या भूमिकेला आपल्या लाडक्या आजी-माजी आमदारांसाठी राज्य सरकारने सर्व नियमांना डावलून 48 महाविद्यालयांना मंजूरी दिली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधात बामूची व्यवस्थापन परिषद सदस्यांची टीम उभी राहण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या बळावर नेत्यांनी संबंधित महाविद्यालयांना मान्यता मिळवून आणली असली तरी संलग्नीकरण आमच्या हातात आहे. या महाविद्यालयांना संलग्नीकरण नियमांच्या आणि कायद्याच्या चौकटीतच दिले जाईल, अशी रोखठोक भूमिका एका व्यवस्थापन परिषद सदस्याने आदर्श गावकरीसमोर मांडली. विद्यापीठाच्या कार्यक्षेञात यंदा पारंपारिक महाविद्यालयांचे 118 बिंदूसाठी 258 महाविद्यालयांचे प्रस्ताव आले होते. मात्र शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या नियमावलीत बसणारे फक्त 15 प्रस्ताव मंजूर केले होते. तर इतर 238 महाविद्यालयांचे प्रस्ताव या समितीने उधळून लावले होते. माञ, आपल्या लाडक्या आजी-माजी आमदारांच्या महाविद्यालयासांठी या समितीच्या निकषांना डावलून विद्यापीठाने फेटाळलेल्या 238 महाविद्यालयांपैकी
48 नव्या महाविद्यालयांना राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता वादाच्या भोवर्यात अडकण्याची चिन्हे आहेत. या निर्णयाच्या विरोधात बामूची व्यवस्थापन परिषद सदस्यांची टीम उभी राहणार आहे. विद्यापीठाने फेटळालेल्या महाविद्यालयांना सरकार मान्यता देते, हे चूकीचे आहे. यामुळे, विद्यापीठाची प्रतिमा मलीन झाली आहे. याविषयी आम्ही सर्व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य बैठक घेऊ आणि त्यानंतर आमची भूमिका मांडू. मात्र एकही निर्णय नियमांच्या बाहेर जाऊन घेतला जाणार नाही, असे देखील एका व्यवस्थापन परिषद सदस्याने म्हटले आहे.