हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सर्व आशा सेविकांसाठी (Asha Workers) राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक (Asha Workers And Group Promoters) यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख आणि कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास 5 लाख रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 1 एप्रिल 2024 पासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन, निर्माण करण्याच्या दृष्टीने “आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक” महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांना माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित गृहभेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे पाठविणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावावी लागतात. त्याच्या कामाचे हे स्वरूप पाहता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख आणि कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास 5 लाख रुपयांची मदत आशा सेविकांना केली जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरुपी अंपगत्व झाल्यास, त्यांना ₹१० लाख/₹५ लाखांचे आर्थिक अनुदान मिळणार आहे – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री @TanajiSawant4MH pic.twitter.com/nvjSJDpnad
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 27, 2024
यासाठी प्रतिवर्ष १ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद कऱण्यात आली आहे. तसेच आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील ७४ हजार आशा सेविका आणि साडेतीन हजार गटप्रवर्तक यांना लाभ होणार आहे. यापूर्वी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने आशा सेविकांच्या मानधनात ५००० रुपयांची घसघशीत वाढ केली होती. आणखी १० लाख रुपयांचा विमा काढण्यात आल्याने आशा सेविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.