हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यातील प्रतापगड पायथ्याजवळील अफजलखान कबर जवळील अतिक्रमण नुकतेच प्रशासनाच्यावतीने हटवण्यात आले. यानंतर आता राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ती म्हणजे अतिक्रमण काढलेल्या ठिकाणीच आता अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा देखावा असणारा छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज केली.
राज्य सरकारने प्रतापगड या ठिकाणी नुकतीच एक मोठी कारवाई केली. शिवप्रतापदिनाचे औचित्य साधत प्रतापगडावरील अफजलखानच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. 10 नोव्हेंबर रोजी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचा वध करण्यात आला होता आणि याच दिवशी अनाधिकृत बांधकाम पाडण्यात आली. त्यानंतर आता राज्य सरकारने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणारण्याचा निर्णय सरकारच्यावतीने आज घेण्यात आला आहे.
शिवभक्तांच्या मागणीला लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट व साउंड शो सुरु करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे!#shivpratap #छत्रपतीशिवाजीमहाराज #प्रतापगड pic.twitter.com/SyR0v23av3
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) November 15, 2022
पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ट्विट करत राज्य सरकारने घेतलेल्या घोषणा केली. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘शिवभक्तांच्या मागणीला लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट व साउंड शो सुरु करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे’.
दोन दिवसांपूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्यात आले. मात्र, त्यावेळी आणखी दोन कबरी आढळून आल्या आहेत. यातील एक कबर ही अफजलखानाचा वकील असलेल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याची असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केला आहे. तर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचा दहन विधी झाल्याचा उल्लेख असल्याचा दावा हिंदू महासंघाने केला आहे. या कबरी नेमक्या कोणाच्या याबाबत सध्या माहिती घेण्याचे काम महसूल विभागाकडून केले जात आहे. मात्र, आता या ठिकाणी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा देखावा असणारा छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे.