मुंबई | वाढत्या इंधन दरवाढीमूळे सामान्य नागरिक हतबल झाला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर ‘शंभरी’ गाठतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. जनतेत इंधन दरवाढी विरोधात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. परिणामी पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. पेट्रोल -डिझलचे दर कमी करण्यासाठी राज्य सरकार दारूच्या किमती महाग करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. देशी बनावटीच्या विदेशी दारूवरील (व्हिस्की, रम, जीन इ.) एक्साईज ड्युटी वाढवण्याचा प्रस्ताव शासनासमोर आला आहे अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
२०१३ पासून देशी बनावटीच्या विदेशी दारूवरील एक्साईज डय़ुटीत कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही याकडे एक्साईजच्या या अधिकाऱ्याने लक्ष वेधले. महाराष्ट्रात या दारूची बेफाम विक्री होते हे लक्षात घेऊनच सरकार अशाप्रकारचा निर्णय घेऊ शकते. परिणामी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करता येईल आणि ते स्वस्त होईल, असा सरकारचा विचार आहे. २०१७ मध्ये देशी दारूवरील तर २०१५ मध्ये मिलिट्री कॅण्टीनमध्ये मिळणाऱया दारूवरील एक्साईज ड्युटी वाढविण्यात आली होती.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) खात्याच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी व्हिस्की-रमसाख्या दारूवरील कर २०१३ पासून वाढलेला नाही हे कबूल केले; पण असा करवाढीचा प्रस्ताव माझ्यापर्यंत तरी आलेला नाही, असे स्पष्ट केले आहे.