मुंबई । यापुढे कोरोनाचा रिपोर्ट थेट रुग्णांना दिला जाणार नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. हा निर्णय घेण्यामागचे कारणही यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले. रुग्णांना कोरोनाचा रिपोर्ट दिल्यास कोणतीही लक्षणे नसलेली व्यक्ती देखील तो रिपोर्ट घेऊन खासगी रुग्णालयात दाखल होते. खासगी रुग्णालयात गरज नसताना त्यांना ऑक्सिजन आणि आयसीयू दिले जाते. त्यामुळे इतर रुग्णांना जागा मिळत नाहीत. खाजगी रुग्णालये लक्षणे नसलेल्या लोकांना दाखल करून घेतात आणि पैसे कमावतात. त्यामुळे रुग्णांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. ज्या रुग्णांना खरंच बेडची गरज आहे त्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याचसोबत रेमडेसेवीर आणि टोसीलोझुबामिन या दोन इंजेक्शनची मागणी राज्यभरातून होत असून याच्या पुरवठ्याची मागणी पंतप्रधानांकडे करणार असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. त्याची किंमतही कमी ठेवावी अशी आमची मागणी असल्याचेही ते म्हणाले. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ही इंजेक्शन्स फायदेशीर आहेत. तसेच राज्य सरकारचा हेतू स्वच्छ आहे. आम्हाला काहीही लपवायचे नाही असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या आरोपाला उत्तर दिले. ५०० व्हेंटीलेटरची मागणीही पंतप्रधनांकडे करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितलं.
कोरोना चाचणीचे दर आम्ही दोन दिवसांपूर्वी निश्चित केले. त्यानुसार हे दर २ हजार २०० आणि २ हजार ८०० इतके दर केले आहेत. यापैकी पण जे फक्त नुमने थेट लॅबमध्ये जातात त्यासाठी २ हजार ८०० रुपये आकारले जातात. आणि जर रुग्ण स्वतः चाचणीसाठी जात असतील तर २ हजार २०० रुपये घ्यावे असे त्यांनी म्हटले मुंबईत रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही अशी तक्रार आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये ५ ते १० रुग्णवाहिका आम्ही ठेवत आहोत. तरी १९१६ किंवा वॉर्ड ऑफिसच्या नंबरवर फोन करून रुग्णवाहिकेची मागणी करावी. खाजगी रुग्णवाहिकेची मागणी करू नये असे आवाहन टोपे यांनी केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”