व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

वेदांतवरून राजकारण तापणार; उद्या युवासेनेची राज्यभर निषेध मोहीम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर या घटनेचा निषेध करण्यासाठी युवासेनेकडून संपूर्ण राज्यभर निषेध मोहीम राबविण्यात येणार आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सामील व्हा!! वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प “खोके सरकारच्या” हलगर्जीपणामुळे गुजरातमध्ये गेला, यामुळे १ लाख तरुणांचा रोजगार गेला याच्या निषेधार्थ युवासेनेतर्फे उद्या १५ सप्टेंबर रोजी राज्यभर निषेध मोहीम राबविण्यात येणार आहे. असं ट्विट शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून करण्यात आलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पावर मेहनत घेतली होती, अनेक बैठक घेतल्या होत्या. ही कंपनी तळेगाव येथे स्थापन होणार हे सुनिश्चित झालं होत मात्र या नवीन सरकारच्या कारभारामुळे ही कंपनी आपल्याला सोडून गुजरातला गेली आणि १ लाख होतकरू तरुणांचा रोजगार गेला. महाराष्ट्राच्या तरुणांसाठी, युवकांसाठी ही गंभीर बाब आहे. म्हणूनच या घटनेचा निषेध करण्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात – शहरात, प्रत्येक मुख्य चौकात निषेध मोहीम आम्ही हाती घेणार आहोत अशी माहिती वरुण सरदेसाई यांनी दिली