व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक ! सावत्र आई असलेल्या मावशीचे लहानग्यावर अमानुष अत्याचार

दिंडोरी : हॅलो महाराष्ट्र – आपल्यामध्ये एक म्हण आहे माय मरो आणि मावशी जगो. पण दिंडोरी या ठिकाणी आई आणि मावशी या दोन्ही नात्यांना काळिमा फासणारी घटना दिंडोरी तालुक्यातील पाडे या ठिकाणी घडली आहे. यामध्ये एका मूकबधिर मुलाला सावत्र आई असलेल्या मावशीने अंगावर चटके देत अमानुष अत्याचार केले आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. या मुलावर सध्या नाशिकला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर दिंडोरी पोलिसांनी घटनेची दखल घेत कारवाई सुरू केली आहे.

काय आहे प्रकरण
दिंडोरी तालुक्यातील पाडे या ठिकाणी तीन वर्षीय मतिमंद बालकास त्याच्या सावत्र आईने अमानुषपणे मारहाण केली. त्याला अंगावर ठिकठिकाणी चटके देण्यात आले आहेत. या घटनेची माहिती काही नागरिकांना समजताच त्यांनी त्यास दिंडोरी येथे उपचारासाठी नेले तेथे उपचार करून पुढे अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सदर सावत्र आई हि दुसरी कोणी नसून त्याची मावशीच आहे. कौटुंबिक कलहातून सोडून गेलेल्या आईनंतर सावत्र आई ही मावशी असल्याने तिची माया मिळेल अशी आशा होती. पण हि आशा फोल ठरत नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने ठिकठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची दिंडोरी पोलिसांनी दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कलपेशकुमार चव्हाण करत आहे.

सावत्र आईकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले
या सगळ्या प्रकारानंतर सावत्र आईच मुलाला रुग्णालयात घेऊन आली. यानंतर सावत्र आईने मुलाला चटके दिल्याचा आरोप फेटाळला आहे. हा लहानगा आणि त्याच्या मोठ्या भावामध्ये भांडण झाल्याने हि घटना घडली आहे. असा दावा या महिलेकडून करण्यात येत आहे.