जालन्याला निघालेल्या दोन एसटी बसवर दगडफेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख भूमिकेवर एसटी कर्मचारी ठामच आहे. दरम्यान सिडको बसस्थानकात शनिवारी चार लालपरी औरंगाबाद-जालन्याकडे रवाना करण्यात आल्या होत्या. त्यापैकी दोन बसवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये दोन्ही बसच्या पाठीमागील काच फुटल्याने एसटीचे अंदाजे दोन हजार रुपयांचे नुकसान झाले.

या घटनेचा परिणाम रविवारी दिसून आला. त्यामुळे रविवारी सिडको- जालना 1, मध्यवर्ती बसस्थानक ते राजूर 1 आणि सोयगाव- अजिंठा 1 या प्रमाणे केवळ तीन बस चालवण्यात आल्या. कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, या राज्य शासनाने केलेल्या आवाहनानुसार शनिवारी सिडको बसस्थानकातील चार वाहक आणि चार चालक कामावर हजर झाले होते. त्यामुळे सिडको बसस्थानकातून जालन्यासाठी चार बस सोडण्यात आल्या होत्या. त्यापैकी दोन बसवर दगडफेक करण्यात आली. एका बसवर केंब्रिज शाळेच्या पुढे तर दुसऱ्या बसवर शेकट्याच्या पुढे पाठीमागून दगडफेक करण्यात आली.

या दगडफेकीत कुणी जखमी झाले नाही, मात्र दोन्ही बसच्या पाठीमागील काचा फुटल्या. त्यामुळे दोन्ही बसचे अंदाजे दोन हजाराचे नुकसान झाले. रविवारी सकाळी नऊ वाजता सिडको बसस्थानकातून जालन्याकडे बस रवाना करण्यात आली होती. जाताना या बसमध्ये 23 प्रवासी होते तर येताना 17 प्रवासी होते. या बसने 3 हजार 675 रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. तर मध्यवर्ती बसस्थानकातून रविवारी सकाळी 7 वाजता राजूरसाठी बस सोडण्यात आली होती. ही बस राजूरला जाऊन पुन्हा सुरक्षीत मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचली.