हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जालन्यामध्ये कामानिमित्त गेलेल्या माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी दगडफेक केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर काही वेळापूर्वीच राजेश टोपे यांच्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आली आहे. त्यानंतर काही अज्ञात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याचे वृत्त ही समोर येत आहे. या संपूर्ण घटनेमुळे राजेश टोपे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी राजेश टोपे मध्यवर्ती सहकारी बँकेत कामानिमित्त गेले होते. याचवेळी काही अज्ञात तरुणांनी येऊन थेट राजेश टोपे यांच्या गाडीची तोडफोड करण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु तोपर्यंत ते तरूण तेथून फरार झाले होते. सध्या बँकेच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने पोलीस दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.