बीड | जिल्ह्यातील कृषी दुकानदारांकडून, बी-बियाणे, खते वाढीव दराने विकली जात आहेत. त्याबाबत अनेक शेतकऱ्यांकडून तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे ही शेतकऱ्यांची लूट तात्काळ थांबवण्यात यावी. अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
त्या दिलेल्या पत्रात म्हणाल्या, की सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांकडून खते व बी-बियाणेची मागणी वाढत आहे. कोरोनामुळे अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. अशातच कृषी दुकाने याची चढ्या भावाने विक्री करून सर्व सामान्य शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. शासनाने ठरवलेल्या दराप्रमाणेच शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे उपलब्ध करून द्यावेत आणि शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
पाऊसाच आगमन झाल्याने खरीप हंगामातील पेरणीच्या तयारीला शेतकरी लागले आहेत. यामध्ये बी-बियाणांची खरेदी करत आहेत. मात्र कृषीची दुकाने शेतकऱ्यांकडून चढ्या भावाने पैसे घेऊन त्यांची पिळवणूक करत आहेत यामुळे शेतकर्यांच्या वतीने काल आंदोलन देखील करण्यात आले होते.