सांगली प्रतिनिधी । कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर साई फेकल्याची घटना घडली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत. आज, सकाळी मिरजेत संतप्त शिवसैनिकांनी बस स्थानक परिसरात एकत्र येऊन कर्नाटकच्या गाड्या फोडल्या. या परिसरात असलेल्या हॉस्पिटल वरील कर्नाटक अक्षारतील बोर्ड ही शिवसैनिकांनी दगड मारून फाडले. याप्रकरणी मिरज गांधी चौकी पोलिसांनी मिरज शहर अध्यक्षांसह ९ जणांना ताब्यात घेतले. कर्नाटकमधून आलेल्या तीन गाड्या शिवसैनिकांनी फोडल्या. त्यापैकी दोन गाड्या गांधी चौकी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या.
कर्नाटकातील बेळगाव येथे काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली. भाजप शासित कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झाल्याने राज्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. सांगली जिल्ह्यातही त्याचे संतप्त पडसाद उमटले. शिवसेनेचे मिरज शहर अध्यक्ष चंद्रकांत मैगुरे, विजय शिंदे, महादेव हूलवान, अतुल रसाळ, पप्पू शिंदे, गजानन मोरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी स्टेशन चौकात एकत्र येत कर्नाटक राज्यातील वाहनांना लक्ष केले. कर्नाटक पासिंग असलेल्या प्रत्येक वाहनांवर यावेळी तुफान दगडफेक करण्यात आली. बॅट, स्टंप आणि गाडीवर उभा राहून लाथा मारत यावेळी काचा फोडण्यात आल्या. परिसरात असणाऱ्या मेडिकल दुकानांवरील कन्नड बोर्डांवर दगडफेक करत ते बोर्ड फाडण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिक, प्रवाशी आणि स्थानिक दुकानदारांची एकच धावपळ उडाली.
शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करून यावेळी परिसर दणाणून सोडला होता. घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी पोलीस ठाणे तसेच मिरज शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ दाखल झाले. तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेले. घडलेल्या या घटनेमुळं मिरजेत तणावाचे वातावरण होते. कोणताही अनुचित प्रकार पुन्हा घडूनये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दगडफेकीमध्ये नुकसानग्रस्त झालेली वाहने पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावली होती. या घटनेच्या निषेधार्थ पुन्हा संतप्त शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेख घालून कर्नाटक सरकारचा निषेध केला.