खंबाटकी घाटात विचित्र अपघात : चार वाहनांच्या धडकेत 1 ठार 6 जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | पुणे-बंगळूर महामार्गावर खंडाळ्याजवळ नेहमीच अपघातासाठी चर्चेत असलेल्या खंबाटकी घाटातील एस कॉर्नर या वळणावर सिमेंट, खडी- वाळू मिश्रण करणार्‍या मिक्सरने चार वाहनांना धडक दिली. या अपघातात एकजण ठार तर 6 जण जखमी झाले आहेत. सचिन ऊर्फ रणजित मानसिंग जाधव (वय 23, रा. मांगले, ता. शिराळा, जि. सांगली) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेंगरुटवाडी (ता. खंडाळा) गावाच्या हद्दीत उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी हा अपघात झाला. सातार्‍याहून पुण्याकडे जाणार्‍या सिमेंटचे मिश्रण करणार्‍या भरधाव मिक्सरने सुरुवातीला पिकअपला धडक दिली. त्यानंतर अल्टोकार, आयशर टेम्पोला धडक देऊन हा टँकर एस कॉर्नर क्रॉस करून समोरील भरावावर गेला. तेथे जाऊन ट्रॅक्टरवर पलटी झाला. मिक्सर चालक श्रीशैल मारुती कांबळे (रा. विजापूर, कर्नाटक) याच्या ताब्यातील मिक्सर टँकर (क्रमांक एम. एच. 13. सी. यु. 9900) हा भरधावपणे जात असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे टँकर पुढे चाललेल्या अल्टको, पिक-अप, आयशर टेम्पो ला जोरदार धडक देवून ट्रॅक्टरवर पलटी झाला.

या अपघातात पिकअपमधील सचिन उर्फ रणजित मानसिंग जाधव याचा मृत्यू झाला. तर रोहित संजय जाधव (वय 18) गणेश अनिल तडाखे (वय 25, रा. दोघेही रा. मांगले, ता. शिराळा) शकिल दावत शेख (वय 34,) किरण वैजिनाथ शिंदे (वय 18, दोघेही रा. पिंपरी, पुणे) तर टँकरमधील क्लीनर प्रदिप आमशिदा बेल्लेनवार (वय 36, रा. विजापूर, कर्नाटक), ट्रॅक्टर चालक राहुल मोहन वायदंडे (रा. खंडाळा) हे गंभीर जखमी झाले आहे. या अपघातात सर्वच वाहनांचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. क्रेनने अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. यानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.