औरंगाबाद – आजारी असल्याने ऊसतोडीस जाण्यास नकार देणाऱ्या 42 वर्षीय ऊस तोड मजूर महिलेला मुकादमाने अपहरण केल्याची खळबळजनक घटना वाळूज महानगर परिसरातील रांजणगाव शेणपुंजी घडली आहे या महिलेच्या शोधासाठी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पथक माजलगाव ला रवाना झाले आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, रांजणगाव परिसरातील सतीश घायतडक व त्यांची आई हिराबाई हे दोघे चार-पाच वर्षांपूर्वी साखर कारखान्यावर ऊसतोड मजूर म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वी घायतडक कुटुंब रांजणगावात रोजगाराच्या शोधात आले. साखर कारखान्यात ऊस तोडणीसाठी मजूर पाठविणारा मुकादम राजेंद्र टाकळकर (रा. माजलगाव, जि. बीड) दोन महिन्यांपूर्वी रांजणगावात घायतडक यांच्या घरी आला होता. मुकादमाने घायतडक यांच्याशी चर्चा करून येत्या गाळप हंगामात ऊसतोडीसाठी कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यावर जायचे असल्याचे सांगितले. सतीश व त्यांची आई हिराबाई यांनी मुकादम टाकणखार यांच्याकडून उचल म्हणून 1 लाख 10 हजार रुपये घेतले होते. गत काही दिवसांपासून टाकणखारने सतीश यांच्याशी संपर्क साधून ऊसतोडीसाठी चालण्याचा तगादा लावला. मात्र, आईची तब्येत खराब असल्याने सतीश ने जाण्यास नकार दिला.
दरम्यान, टाकणखर शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास दोन साथीदारांसह रांजणगावातील सतीश च्या घरी आला. शहरातून व्याजाने पैसे काढून देतो, तुम्ही व्याज भरा असे सांगून रिक्षा बोलावून हिराबाईंना आपल्या साथीदाराच्या मदतीने शहरात घेऊन गेला. पैशाचे काम झाल्यानंतर मुकादम आईला घरी परत आणून सोडील या आशेने सतीशने पोलिसात तक्रार दिली नव्हती. रविवारी सतीशने आईशी संपर्क साधला असता मुकादमाने माजलगावात कुणाच्या तरी घरी ठेवल्याचे सांगितले. या प्रकरणी दिपाली गायकवाड यांच्या फिर्यादीवरून मुकादम राजेंद्र टाकळकर व त्याच्या दोन अनोळखी साथीदार विरुद्ध एमायडीसीवाळूज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप दुर्वे यांनी उपनिरीक्षक अधाने, सहाय्यक उपनिरीक्षक कय्युम पठाण, आदींचे पथक माजलगावला रवाना केले.