औैरंगाबाद – हॉटेल असो वा रस्त्यावर भेळ, पाणीपुरी विक्रेता त्यांनी ताजे, स्वच्छ, सकस पदार्थच विकले पाहिजे, एवढेच नव्हे तर वैयक्तिक स्वच्छतेवरही भर दिला पाहिजे, यासाठी विक्रेत्यांनी नखे कापणे, डोक्यावरील केस अति वाढू न देता कटिंग केली पाहिजे, सोबत दर महिना किंवा दिड महिन्याला त्यांना स्वत:ची वैद्यकीय तपासणी करावी, असे आदेश अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिले.
एफएसएसएआयच्यावतीने ‘इट राइट इंडिया’ अभियानाअंतर्गत आज सकाळी एमजीएम वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी आयोजित कार्यक्रमात मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सर्वांशी संवाद साधला. त्यांनी सर्वांना आवाहन केले की, निरोगी आयुष्यासाठी सकस, ताजे अन्न खाल्ले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या जीभेवर ताबा मिळव्यायला शिका. भेसळ करणाऱ्यांना त्यांनी इशारा दिला की, यापुढेही हॉटेल, मिठाई, खाद्यतेल विक्रेत्यांच्या दुकानाची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अन्न व व औषध प्रशासनाची मोबाईल व्हॅन सर्वत्र फिरुन ही भेसळ तपासणी करण्यात येईल.
दंड ते सश्रम कारावासाची शिक्षा –
तपासणीचा वेग आता वाढविण्यात येत आहे. भेसळयुक्त अन्न पदार्थ आढळले तर अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. यासाठी १ लाख ते ५ लाखापर्यंतचा दंड व सक्षम कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. इट राइट इंडिया अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांना दर्जेदार अन्न पुरविण्याच्या संकल्पाकडे वाटचाल सुरु झाल्याचेही मंत्री शिंगणे यांनी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधिक्षक निमिष गोयल,एफएसएसएआयच्या विभागीय संचालिका प्रीती चौधरी आणि सहसंचालक संजीव पाटील यांची उपस्थिती होती.