औरंगाबाद | शहरात सध्या शनिवार आणि रविवार या दोन दिवस कडक स्वरूपाचा लॉकडाऊन असल्याने प्रत्येक चौकात पोलिसांनी बॅरिकेट्स लावून नाकाबंदी सुरू केलेली आहे. प्रत्येक नागरिकांची कसून चौकशी केल्यानंतरच सोडण्यात येत आहे, तर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या टवाळखोरांवर पोलीस कारवाई करीत आहेत.
गेल्या महिनाभरापासून शहरात शनिवारी आणि रविवारी कडक स्वरूपाचा लॉकडाऊन आहे. मात्र या लॉकडाऊनला न जुमानता मोठ्या प्रमाणात वाहनधारक, नागरिक रस्त्यावर येत असल्याचे दिसून येत होते. रस्त्यावरील वर्दळ कमी करण्यासाठी आणि विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना अटकाव व्हावा, यासाठी आज सकाळपासूनच शहरातील विविध भागांत पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. प्रत्येक व्यक्तीला थांबवून तुला व्यक्तीस बाहेर निघण्याचे कारण पोलिसांकडून विचारले जात आहे.
विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांविरोधात पोलीस कारवाई करताना दिसत आहेत. महिनाभरात आज पहिल्यांदाच शहरभर पोलिसांची कडक नाकाबंदी पाहायला मिळत आहे. यामुळे गेल्या अनेक विकेंड लॉक डाऊनच्या तुलनेत आज रस्त्यावरील वर्दळ बरीच कमी झाल्याचे दिसून आली. लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सुविधांसह काही जीवनावश्यक वस्तू विक्रीला मुभा देण्यात आली आहे. याचाच गैरफायदा घेत अनेक जण विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहे. अशाच अनेकांवर पोलिसांनी कारवाई केली.