सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली आहे. या अमानुष मारहाणीत विध्यार्थी जखमी झाले आहेत. अंगावर व्रण उठेपर्यंत पोलिसांनी मारहाण केली आहे. या मारहाणीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी कॉलेज बंद केले असून मारहाण करणाऱ्या दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे.
शिरवळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या मारहाण प्रकरणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यावेळी तहसीलदार दशरथ काळे आणि शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी महाविद्यालयात भेट दिली. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी पोलिसानी दिले आहे.
मारहाणीच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या गेटवर ठिय्या मांडला आहे. तसेच न्याय देण्याच्या घोषणा दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना जबरदस्त मारहणा झालेली असून अंगावर व्रण उटलेले आहेत.
नक्की काय प्रकार
काल पशुवैद्यकीय महाविद्यालयात काही विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची तक्रार आली आहे. प्रथमदर्शनी निदर्शनास असे आले की, महाविद्यालयात काही विद्यार्थ्यांचा दंगा सुरू असल्याची तक्रार स्थानिकांनी दिली होती. त्यानुसार तेथे पोलिसांचे दोन कर्मचारी यांना पाठविले आहे. जो काही प्रकार घडला त्यामध्ये मुलांनीही मारहाण केल्याचा आक्षेप नोंदवला आहे. त्याचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरलही झाले होते. सदरचा प्रकार गंभीर स्वरूपाचा आहे. याबाबतची चाैकशी वाई व फलटण पोलिस करत आहेत, त्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल, असे अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी सांगितले.