व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडे डोळसपणे पहावं; डॉ. राधाकृष्ण पंडित यांचे प्रतिपादन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडे डोळसपणे पहावं, स्वतःमध्ये होईल तेवढी संशोधक वृत्ती वाढवावी. कारण “लाईफ सायन्सेस” या क्षेत्रात प्रचंड मोठ्या संधी उपलब्ध आहेत.त्या संधीच सोनं करून घ्या,अशा शब्दात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख व कौशल्य विकास केंद्राचे विद्यमान संचालक डॉ. राधाकृष्ण पंडित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. फर्ग्युसन महाविद्यालयात नुकतेच झूलॉजी असोसिएशन फोरमचे उद्घाटन डॉ. राधाकृष्ण पंडित यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.

यावेळी डॉ.पंडित पुढे म्हणाले की, “बॉटनी,झूलॉजी विषयांमध्ये संशोधनाच्या व रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. फक्त भारतात नाही तर परदेशामध्ये देखील संधी आहेत. विशेषता जर्मनी,अमेरिका येथे मॅक्स प्लॅन्स रिसर्च इन्स्टिट्यूट व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ येथे संशोधन करून विद्यार्थी स्वतःला सिद्ध करू शकतो. त्याची संशोधन करण्याची जिज्ञासा आणि कष्ट घेण्याची ताकत त्याला नामवंत संशोधक बनवु शकते. संशोधक बनून तो विद्यार्थी समाजातील विविध प्रश्न शास्त्रीय पद्धतीने सोडवू शकतो. यातून पर्यायाने समाजाची आणि देशाची सेवा करण्यासाठी संधी मिळते. तसेच बायोमेडिकल रिसर्च, ॲग्रीकल्चर रिसर्च इतर क्षेत्रांमध्ये देखील संशोधनासाठी विशेष संधी उपलब्ध आहेत असही ते म्हणाले.

सोबतच ते पुढे म्हणाले की, “उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये शेतीतून खासकरून गहू आणि तांदूळ या पिकांपासून जे टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यापासून बायोगॅस, बायोडिझेलची निर्मिती व जैविकऊर्जा, जैविकइंधन व अल्कोहोल किंवा समाजोपयोगी पदार्थ निर्माण करता येऊ शकतात. म्हणून त्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. तसेच या अभ्यास क्षेत्रातूनच मरीन स्पॉंजेन्स बॅक्टेरीया,समुद्रातील इतर प्राणी,वनस्पती व वनौषधी यांपासून वेगवेगळ्या रोगांच्या उपचारासाठी संशोधन करता येऊ शकतं. विशेषता कॅन्सरसारख्या घातक आजाराच्या ट्रीटमेंटसाठी अँटीकॅन्सर,अँटीमलेरिया किंवा अँटीएड्स औषधं सुद्धा बनवता येऊ शकतात. यातून रोजगार निर्मिती तसेच स्वतःची प्रगती व संशोधनाच्या माध्यमातून समाजाचा तसेच राष्ट्राचा शाश्वत विकास घडून येऊ शकतो. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन कुलकर्णी,झूलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉक्टर पवार सर, विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,बीएससी – एमएससीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजर होते.