हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आडवाटेवरची भटकंती करणाऱ्यांसाठी रतनगडची सांधण दरी हे प्रसिद्ध ठिकाण. सांधण दरी जवळच नैसर्गिक उभ्या बाणाचा आकाराचा 710 फूट उंच सुळका आहे. चढाईस अत्यंत कठीण व महाराष्ट्रातील सर्वात उंच बाण सुळक्यावर यशस्वी चढाई करण्याची कामगिरी पुण्यातील एस. एल. एडव्हेंचर या संस्थेच्या गिर्यारोहकांनी केली आहे.
बाण या आगळ्या वेगळ्या नावाने प्रसिद्ध असलेला हा सुळका सह्याद्री पर्वतरांगेतील चित्तथरारक चढाईसाठी सुपरीचीत आहे. आजवर येथे अवघ्या बोटावर मोजता येतील एवढ्याच मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष मधमाशांची मोठ-मोठी पोळी, अतिदुर्गम भाग आणि अत्यंत खडतर चढाई मार्ग यामुळे हा सुळका सर करणे हे गिर्यारोहकांसाठी एक मोठे आव्हान असते. पुण्यातील एस. एल. एडव्हेंचर या संस्थेचे प्रमुख लहू उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आखण्यात आली होती. चढाईच्या उच्च काठिण्यपातळीमुळे हा सुळका सर करणे जिकरीचे असते परंतु चढाईचे घेतलेले तांत्रिक शिक्षण अनेक सूळक्यांच्या चढाईचा अनुभव यामुळे ही मोहीम फत्ते झाली.
प्रथम चढाईसाठी तुषार दिघे व कृष्णा मरगळे यांनी पहाटे उठून तयारी चालू केली, सकाळी 6:00 वाजता चढाई सुरू झाली. सुरुवातीलाच पहिल्या स्टेशनवर पोहोचण्यासाठी प्रस्तराच्या उभ्या भेगेला सामोरे जावे लागते, तेथेच एक कठीण मूव्ह घेताना तुषारचा फॉल झाला, अनुभवी बिलेमन कृष्णाने त्याला अलगद झेललं. त्यावेळी तुषारच्या पायामुळे खडकाचा ठिसूळ भाग निखळून खाली कोसळला अन मोठा रॉकफॉल झाला. फॉल-फॉल म्हणत लीडरने सर्वांना सावध केले. सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही. सर्वांनी हेल्मेट घातल्याचा फायदा झाला. सर्व सुरक्षित असल्याचं कळल्याने चढाई पुन्हा सुरू झाली.
पहिला ट्रॅव्हर्स पूर्ण करताच लिडक्लाइंबर कृष्णाला उलट्यांचा त्रास होऊ लागला. कृष्णा तेथून रॅपलिंग करत खाली उतरला. त्या ठिकाणी मंगेश सांबरे यांने चढाई सुरु ठेवत पहिले स्टेशन गाठलं. हळूहळू ऊन वाढत होतं. कृष्णाने प्रथमोपचार घेऊन पुन्हा चढाईचा निर्णय घेतला व जुमार करत पहिले स्टेशन गाठलं. पुन्हा एकदा तुषार-कृष्णा जोडीने चढाई सुरूचं ठेवली. बघता – बघता मुक्त चढाई करत दुसरे स्टेशन गाठलं. या दोघांनी मुक्त चढाईचं छान प्रात्यक्षिक सादर केलं. चढाई करताना सेफ क्लाइंबिंग इनिशिएटिव्ह SCI (स्की) या संस्थेने केलेल्या बोल्टिंगचा खूप उपयोग होत होता, चढाई सुरक्षित होत होती. काही ठिकाणी पिटॉन ठोकून प्लेसमेंट घ्यावी लागत होती, दुपारी 2:00 वाजता आघाडीच्या गिर्यारोहकांनी तिसरं स्टेशन गाठलं, त्याच वेळी खालून योगेश काळे व शंकर मरगळे यांनी चढाई सुरू ठेवली.
सर्व क्षण ड्रोन व कॅमेरामध्ये कैद
जुमार, ग्री-ग्री सारख्या अत्याधुनिक उपकरणाच्या साह्याने आणि त्यांनी अनुक्रमे पहिले व दुसरे स्टेशन गाठलं. वरती चौथ्या स्टेशनसाठी एड क्लाइंबिंग करावं लागणार होतं, बोल्टची उभी चैन पार करायची होती, ही चढाईची जबाबदारी डावखुऱ्या तुषारनं लिलया पेलली व सायंकाळी साडेचारच्या सुमारास चौथे स्टेशन गाठलं आणि कृष्णाला बिले दिला. सर्व क्षण ड्रोन व लांब पल्ल्याच्या कॅमेरामध्ये कैद होत होते. काही वेळातच सुळका सर होणार होता पण तुषारचे हात थकले होते. त्यामुळे थोडा वेळ लागत होता शेवटची मुक्त चढाई करून पाच वाजता तुषार व कृष्णानं बाण सूळक्याच्या माथ्यावर तिरंगा फडकविला आणि सर्वांनी जल्लोष केला.
हर हर महादेव.. जयघोष
हर हर महादेव.. जय भवानी -जय शिवाजी अशा जयघोषानी तो कोथळ्याचा परिसर दुमदुमला. चढाईसाठी मानसिंह चव्हाण, योगेश करे, शैलेश थोरवे, विकास सकपाळ यांनी पहिल्या व दुसऱ्या स्टेशन पर्यंत चढाई करून उपकरणांची व खाण्यापिण्याची मदत रोपच्या साहाय्याने पाठवली. या मोहिमेत अकोल्याचे गिर्यारोहक अमित वैद्य, कविराज भोईर, सतीश मेहेर, प्रसाद बागवे यांनी सहभाग नोंदवला.