पुणे, सोलापूर, सांगली येथील ११ सावकारांवर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
खाजगी सावकारीच्या जाचाला कंटाळून आटपाडी तालुक्यातील घाणंद येथील शिवाजी कदम यांनी सांगलीतील भरती हॉस्पिटलच्या मागे असणाऱ्या रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवाजी कदम यांनी पाच मार्च रोजी सायंकाळी मिरज ते सांगली जाणाऱ्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेची विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. शिवाजी कदम यांच्या वडिलांनी नामदेव कदम यांनी खाजगी सावकाराला कंटाळून मुलाने आत्महत्या केल्याची फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून पुणे, सांगली आणि सोलापूर येथील तब्बल ११ सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी एक पोलीस असल्याचे उघड झाले आहे.
हाती मिळालेल्या माहितीनुसार , घाणंद येथील शिवाजी कदम हे काही काळ पुणे येथे नोकरी करत होते. त्यांनी पुण्यातील काही खाजगी सावकारांकडून पैसे घेतले होते. काही कारणास्तव त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यांनी पुन्हा गावी येऊन शेती व्यवसाय सुरु केला. शेतीमध्ये काही फायदा होत नसल्याने त्यांनी टेंम्पो घेऊन व्यवसाय सुरु केला, मात्र त्या धंद्यात देखील त्यांना फायदा होत नव्हता. कदम यांनी पुणे येथील चौघा खाजगी सावकारांकडून पाच ते दहा टक्के व्याजाने दोन लाख ३० हजार रुपये घेतले होते. सांगलीमध्ये कदम आल्यानंतर त्यांनी सोलापूर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या दिनेश ससाणे यांच्याकडून दहा टक्के व्याजाने ७० हजार रुपये घेतले होते. टेम्पो व्यवसायातून फायदा होत नसल्याने कदम यांना सावकारांकडून घेतलेले पैसे परत करणे शक्य होत नव्हते.
दरम्यानच्या काळात शिवाजी कदम यांनी सांगलीतील त्यांच्याकाही नातेवाईकांकडून हि उसने पैसे घेतले होते. तेही त्यांना परत करता येत नव्हते, त्यामुळे संतापाच्या भरात नातेवाईकांनी त्यांना जबरी मारहाण केली होती. व्याजाने घेतलेल्या पैशांसाठी सावकारांचा तगादा आणि नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीमुळे विवंचनेत सापडलेल्या शिवाजी कदम यांनी पाच मार्च रोजी भारती हॉस्पिटलच्या मागे असणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर सांगली-मिरज रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. मुलाने आत्महत्या केल्याचे समजताच शिवाजी कदम यांच्या वडिलांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत खाजगी सावकारीच्या जाचाला कंटाळून आणि नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीमुळेच मुलाने आत्महत्या केली असल्याची फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार पुणे, सोलापूर, सांगली येथील एकूण अकरा खाजगी सावकारांवर सावकारी, मारहाण करणे यासह आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.