हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील आमदार सुहास कांदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यातील वाद सर्वानाच माहित आहे. आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी सुहास कांदे चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट काही प्रश्न विचारले, फडणवीसांनी उत्तरे देऊनही सुहास कांदे यांचे समाधान झालं नाही. त्यानंतरही ते पुन्हा उभे राहून बोलू लागले. यावेळी बोलताना सुहास कांदे यांनी थेट, तुम्ही आमच्या उद्धव साहेबांना ब्लॅकमेल केलंच तुम्ही… असे विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
सभागृहात नेमकं काय झालं-
छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात कथित भ्रष्टाचारासंदर्भात सुहास कांदे यांनी काही प्रश्न विचारले. 1160 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे, मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हे प्रकरण मागे घेण्यात आले आणि त्यात तत्कालीन मंत्री असलेले नेत्यांना निर्दोष सोडण्यात आले. विधी व न्याय विभागाने कोणाच्या दबावाखाली याप्रकरणी निर्णय दिला याची चौकशी होणार का? असा सवाल सुहास कांदे यांनी फडणवीसांना केला.
यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, या संदर्भातील दोन जीआर रद्द करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला नसून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकारात केला आहे. त्यामुळे याची पुन्हा तपासणी करता येते का हे पाहिलं जाईल तसेच पुन्हा अपील करता येईल का याचीही चौकशी केली जाईल, असे फडणवीस म्हणाले, मात्र या उत्तरावर सुहास कांदे यांचे समाधान झाले नाही.
सुहास कांदे यांनी पुन्हा एकदा उभा राहून आपले प्रश्न उपस्थित केले. याप्रकरणी २ जीआर निघले. त्या निकालामुळे न्यायाधीशांची बदली झाली याचा अर्थ तो निकाल संदिग्ध आहे. आता तुम्हाला पुन्हा ओपीनियन मागवायची गरज नाहीये. म्हणजेच तुम्ही भ्रष्टाचार करुन ओपीनियन मागवलं. आमच्या उद्धव साहेबांना ब्लॅकमेल तर केलंच तुम्ही, असंही विधान सुहास कांदे यांनी केलं. फडणवीस साहेब आपण भ्रष्टाचार विरोधी आहात, त्यामुळे तुमच्या उत्तराने मी समाधानी नाही. फडणवीस साहेब, तुमच्याकडे बघून तर आम्ही इकडे आलोय… हायकोर्टाने याप्रकरणी ताशेरे ओढले आहेत त्यामुळे तुम्ही गोलमोल उत्तर देणार देऊ नका असे म्हणत सुहास कांदे आक्रमक झालं.