औरंगाबाद | ज्या मित्रावर विश्वास ठेवून पती आणि अल्पवयीन मुलांना सोडून विवाहिता घराबाहेर पडली, त्याच मित्राने धोका दिल्यामुळे आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर आली सुदैवाने दामिनी पथकाने धाव घेतल्याने त्या विवाहितेचा जीव वाचला ही घटना शिवाजीनगर रेल्वे रुळावर घडली
एक 35 वर्षीय विवाहित महिला शिवाजीनगर रेल्वे रुळावर रडत बसली असल्याची माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. त्याचवेळी दामिनी पथकाच्या प्रमुख हवलदार निर्मला निंभोरे यांनी तेथे धाव घेतली. पोलिसांनी त्या महिलेला रुळावरून बाजूला घेतले. तेव्हा ती रडतच मला जगायचे नाही म्हणत होती. तिने दिलेल्या माहितीनुसार तिचा मित्र राजपूतच्या सांगण्यावरून तिने आठ व अकरा वर्षांच्या मुलांना पतीकडे ठेवले, आणि सासरचे घर सोडून ती मित्राकडे राहण्यास आली. काही दिवस मित्रांसोबत राहिली.
त्या नंतर मित्राने आपला विश्वासघात केल्याचे तिच्या लक्षात आल्याने, आता पती देखील आपल्याला घरात घेणार नाही. असे समजून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने दामिनी पथकाला सांगितले. पोलिसांनी तिचे समुपदेशन करून तिच्या डोक्यातून आत्महत्येचा विचार काढला. दामिनी पथक वेळेवर पोहोचले नसते तर मोठा अनर्थ झाला असता. सुदैवाने विवाहितेला वाचविण्यात पोलिसांना यश आले.