नांदेड | महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज कसे फेडावे यासह पेरणीसाठी बी बियाणे व मुलाच्या शाळेचा खर्च कसा करावा या चिंतेतून कंधार तालुक्यातील बारूळ येथील अल्पभूधारक शेतकरी शिवाजी श्रीराम वाखरडे (37) यांनी 29 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. बारूळ येथील अल्पभूधारक शिवाजी श्रीराम वाखरडे यांना दोन मुले असून मोठा मुलगा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षण घेत आहेत. लहान मुलगा चौथीत शिकत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शेतकरी वाखरडे यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक बारुळ शाखेकडून 50 हजार रुपये कर्ज घेतले होते.
परंतु सततच्या नापिकीमुळे हे कर्ज फेडणे त्यांना कठीण झाले होते. तसेच या सहकारी कर्ज होते. कर्जाचा डोंगर वाढत असल्याने व पेरणीसाठी बी-बियाणे व मुलीच्या शाळेचा खर्च कसा करावा या चिंतेत होते. अखेर त्यांनी 29 रोजी राहत्या घरी सायंकाळी पाच ते साडेपाच दरम्यान, घराच्या पत्राखालील लाकडी धांडीला नायलॉन दोरीनेबांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात बारूळ येथे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी विठ्ठल सावरगावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उस्माननगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब थोरे पोलीस पाटील संजय जाधव, उपसरपंच शंकरराव नाईक, डॉ. योगेश दुल्लेवाड यांनी पंचनामा केला. या शेतकऱ्याच्या पश्चात दोन मुले आई-वडील असा परिवार आहे. आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.