औरंगाबाद – अवघ्या 14 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेस माहेरहून सात लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याने तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी औरंगपूर- हर्सूल येथे घडली आहे. सासरच्या मंडळींना अटक करण्याच्या मागणीसाठी विवाहितेच्या माहेरच्यांनी बुधवारी वाळूज ठाण्या समोरच पाच तास ठिय्या दिला. याप्रकरणी विवाहितेचा पती अक्षय शिंदे यास अटक करण्यात आली असून, सासू-सासरे अटक करण्याचे आश्वासन दिल्यावर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्याची तयारी दाखवली.
औरंगाबाद जिल्ह्यातील वाहेगाव (ता.गंगापूर) येथील रामचंद्र मनाळ यांची एकुलती एक मुलगी प्रांजली हिचा विवाह अवघ्या 14 महिन्यांपुर्वी औरंगपूर (हर्सुली) येथील अक्षय तात्याराव शिंदे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर आरोपी अक्षय तात्याराव शिंदे (पती), सासरा तात्याराव खंडेराव शिंदे (सासरा) व कमलबाई तात्याराव शिंदे (सासू) यांनी प्रांजली हिस माहेरहून सात लाख रुपये आणण्याची मागणी केली. मात्र ती पूर्ण होत नसल्याने आरोपींनी प्रांजलीचा मानसिक व शारीरिक छळ सुरु केला.
त्यामुळे प्रांजलीने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सायंकाळी तिचा मृतदेह काढून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेनंतर काल प्रांजलीच्या माहेरच्या मंडळींनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वाळूज पोलिस ठाण्यात धाव घेत ठिय्या मांडला. या आरोपींमध्ये छावणी पोलीस ठाण्याच्या पोलिस कॉन्स्टेबलचाही समावेश आहे. अखेर पाच तासानंतर वाळूज पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.