हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी बीडमधून तिरुपतीला पायी यात्रा करणाऱ्या शिवसैनिकाचा मृत्यू झाला. सुमंत रुईकर असे या शिवसैनिकाचे नाव असून बीड ते तिरुपती असा 1100 किमी पायी चालत जाऊन मुख्यमंत्र्यांसाठी साकडे घालण्याचा सुमंत रुईकर यांचा नवस होता.
सुमंत रुईकर आणि त्यांच्या मित्रानं पायी चालत तिरुपतीला जाण्याचा संकल्प केला होता. मात्र अचानक ताप आल्यानं रुईकर यांची प्रकृती बिघडली होती. कर्नाटकमधील रायचूर येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. अखेर, शनिवारी दुपारी सुमंत रुईकर यांची प्रकृती खालावल्यानं निधन झालं.
सुमंत रुईकर हे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे समर्थक आहेत. यापूर्वी देखील उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी तिरूपतीला पायी प्रवास केला होता. तेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर पायी चालत तिरुपतीचे दर्शन करण्याचा नवस सुमंत रुईकर यांनी केला होता.