Thursday, October 6, 2022

Buy now

मराठवाड्यात उन्हाचा पारा आणखी वाढणार

औरंगाबाद – मराठवाड्यात उन्हाळ्यातील तापमान एक ते दोन अंशांनी तर आठ जिल्ह्यांत सरासरी पाऊस 8 ते 21 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. ‘सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी ॲण्ड पॉलिसी (सीएसटीपी) या संशोधन संस्थेने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा अभ्यास करून निष्कर्ष काढले आहेत. त्यात मराठवाड्यातील ही स्थिती असेल.

राज्यात उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमान मागील 30 वर्षांच्या (1991-2019) तुलनेत 2021-2050 या काळात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढणार आहे. पाऊस आणि अतिपावसाचे दिवस, प्रमाण वाढणार असल्याचेही पूर्वानुमान संस्थेने काढले आहे. बदलत्या हवामानाचे गंभीर परिणाम महापूर, शेती, वने, वन्यजीव, आरोग्य आणि विकासकामांवर होणार असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.

संस्थेने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी जानेवारी 2022 मध्ये हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या आयएमडी आणि आयपीसीसी आकडेवारीवरून 1991 ते 2019 या 30 वर्षांच्या अभ्यासातून 2021 ते 2050 या दरम्यान महाराष्ट्रासह देशाच्या पश्‍चिम राज्यातील हवामान बदलाचा अंदाज व्यक्त केला आहे. आयएमडीची आकडेवारी, कोरोडेक्स मॉडेलच्या माध्यमातून राज्यातील सर्वच जिल्हानिहाय अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. आधीच हवामान जोखीम निर्देशांकात भारत सातव्या आणि नैसर्गिक आपत्ती निर्देशांकात तिसरा आहे. त्यामुळे हा अहवाल धोक्याची सूचना देत आहे.