हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू आणि आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकीपटू सुनील नरेनने इंडियन प्रीमियर लीग 2023 सुरू होण्यापूर्वी जबरदस्त फॉर्मचे संकेत दिले आहेत. सुनील नरेनने एका सामन्यात आश्चर्यकारक गोलंदाजी करत 7 षटकात 7 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे यामध्ये त्याने एकही रन दिली नाही. म्हणजेच त्याने सर्व ओव्हर मीडन टाकल्या आहेत.
वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या स्थानिक स्पर्धेत सुनील नरेनने हा भीमपराक्रम केला आहे. क्वीन्स पार्क क्रिकेट क्लबकडून खेळताना, सुनील नरेनने क्लार्क रोड युनायटेडविरुद्ध अक्षरशः कहर केला. त्याने ७ षटकात ७ मीडन ओव्हर टाकत ७ विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय शॉन हॅकलेटने 18 धावांत 2 बळी घेतले. नरेनच्या या घातक गोलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी संघाचा अवघ्या ७६ धावांत खुर्दा झाला. त्यानंतर क्वीन्स पार्क संघाने 3 गडी गमावून 268 धावा केल्या आणि 192 धावांची आघाडी घेतली.
सुनील नरेनच्या या दमदार प्रदर्शनामुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या गोटात आनंदाचे वातावरण असेल. कारण सुनील नरेन कोलकात्याच्या अंत्यंत भरवशाचा गोलंदाज आहे. २०१२ पासून तो केकेआरच्या संघाचा महत्त्वाचा भाग आहे. नरेनने अनेकदा टिच्चून गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाच्या धावाना लगाम घातला आहे. तापर्यंत आयपीएलमधील 148 सामन्यांमध्ये 152 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट फक्त ६.६२ राहिला आहे. तर फलंदाजीमध्ये सुद्धा त्याने केकेआर साठी मोठं योगदान दिल आहे. नरेनने 162.7 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने एकूण 1025 धावा कुटल्या आहेत. ज्यामध्ये ४ अर्धशतकांचा समावेश आहे.