हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळे वळण प्राप्त झाले आहे. सकाळी भाजप नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत सुनील पाटील यांच्यावर आरोप केला. या आरोपानंतर सुनील पाटील याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी या प्रकरणात आपल्याला गोवण्यात आले आहे. पाच ते सहा दिवसांपूर्वी मनिष आणि धवल भानुशाली यांनी मला दिल्लीत बोलावून घेतले. आणि दिल्लीत गेल्यावर या दोघांनीही मला जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप सुनील पाटील यांनी केला आहे.
सुनील पाटील याने आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले की, आर्यन खानच्या प्रकरणाचा मास्टरमाइंड मी नाही. ज्यावेळी हे प्रकरण घडले त्यावेळी मी अहमदाबादमध्ये नोवाटल, हिल्टॉन हॉटेलमध्ये होतो. पाच सहा दिवसांपूर्वी मनिष भानुशाली आणि धवल भानुशालीने मला दिल्लीला बळावून घेतले. मी भाड्याची कार घेऊन दिल्लीला गेलो. दिल्लीत गेल्यावर या दोघांनी पहिल्या दिवशी मला धमकी दिली, मारहाणही केली.
मनिष भानुशाली आणि धवल भानुशाली या दोघांनी मला मारहाण करीत इथून गेला तर मारून टाकू, आम्ही मोठ्या नेत्यांना भेटणार आहोत. तू यांना एक्सपोज कर, असे सांगितले. त्यावर, काय एक्सपोज करू? जे सत्य आहे ते सांगा ना. मी कशाला कुणाला एक्सपोज करू, असे मी दोघांना सांगितले, असे यावेळी सुनील पाटील म्हणाले. या प्रकरणात मला फसवलं गेले आहे. मी कधीच सह्याद्री अतिथीगृहात गेलो नाही. तसेच मी नवाब मलिक यांना कधीच भेटलो नाही. या प्रकरणावर 10 तारखेला माझे नवाब मलिकांशी बोलणे झाले होते. या प्रकरणात मला अडकवून हे लोक मला ठार मारतील याची मला भीती वाटतेय असेही मी मलिक यांना सांगितले होते. त्यांनी मला पोलिसात जाण्याचा सल्लाही दिला.