हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी अजित पवार गटाची कर्जत येथे निर्धार सभा पार पडली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी जसे मुख्यमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य केले तसाच एक मोठा खुलासा खासदार सुनील तटकरे यांनी केला. सभेत बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा झाली होती. त्यावेळी काँग्रेसचे दुसरे नेते मुख्यमंत्री होणार होते. राष्ट्रवादीने त्याला संमती दिली होती.” तटकरे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकिय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
नेमके काय म्हणाले?
कर्जतमधील निर्धार सभेत सुनील तटकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्याचबरोबर, “पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा झाली होती. काँग्रेसचे दुसरे नेते मुख्यमंत्री होणार होते , राष्ट्रवादीने त्याला संमती दिली होती. शपथविधीचा दिवस ही ठरला होता. परंतु परदेशात असलेले काँग्रेसचे नेते परत आल्यावर त्या निर्णयात बदल झाला. कदाचित तो बदल होऊन जर निर्णय झाला असता तर राज्यात सत्ता आली असती” असे देखील ते म्हणाले.
पुढे बोलताना “अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेकवेळा निरोप दिले. ती भेट झाली असती तर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भुमिका घेतली असती तर तुमचा राजीनामा घ्यावा लागला नसता. ती भेट का होऊ दिली नाही, काय माहित?. नंतर राजीनामा मंजूर झाल्याचं कोलकाता येथे जाहीर झालं.” अशी माहिती तटकरे यांनी दिली.
दरम्यान, “कोणीतरी दावा करत की मी अलिबागला एक बैठक घेतली होती. मी त्यांना सांगतो अलिबागमध्ये जी बैठक झाली ती शरद पवार यांनी मला घ्यायला लावली होती. २०१७ साली राष्ट्रवादी आणि भाजप सरकार स्थापन झालं असतं. त्यावेळी याच हॉटेलमध्ये बैठक झाली होती. आज देखील त्याच हॉटेलमध्ये बैठक पार पडत आहे. काय योगा योग असतात त्यावेळी मी अध्यक्ष होतो आजही अध्यक्ष आहे” असा गौप्यस्फोट निर्धार सभेत सुनील तटकरे यांनी केला.