अयोध्या । सुन्नी सेंट्रल वफ्फ बोर्डने अयोध्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या ५ एकर जमिनीवर बांधकामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. या जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या सुविधांच्या पायाभारणी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बोलवण्याची इच्छा वफ्फ बोर्डने व्यक्त केली आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबाबतचे वृत्त दिलं आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, वफ्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी लवकरच आपण पंतप्रधान कार्यालयाशी पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासंदर्भातील चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे. हा पायाभरणीचा कार्यक्रम सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला होणार असल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे.
सुन्नी बोर्डाचे कार्यकारी अध्यक्ष असणाऱ्या एस. एम. शोएब यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना त्यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत. “आम्ही उभारत असलेल्या वेगवेगळ्या सुविधांच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी आम्हाला पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करायला आवडले. आम्ही कम्युनिटी किचन, रुग्णालय, संग्रहालय, ग्रंथालय यासारख्या गोष्टी या जमिनीवर उभारणार आहोत. बोर्डाच्या बैठकीमध्ये आम्ही पाहुण्यांच्या अंतिम यादीवर शिक्कामोर्तब करु. जर या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी हजेरी लावली तर ती आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल,” असं म्हटलं आहे. इस्लाममध्ये मशीदीचे बांधकाम सुरु करताना भूमिपूजनासारखा सोहळा केला जात नाही असंही शोएब यांनी यावेळी स्पष्ट केलं.
“आठवडाभरापूर्वीच या जमिनीचे कागदपत्र आमच्या ताब्यात देण्यात आले. पुढील आठवड्यापर्यंत आम्हाला या जमिनीचा ताबा मिळाले. एकदा आम्हाला जमीन ताब्यात मिळाली की तिची मोजणी केली जाईल. त्यानंतर आम्ही या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या वास्तूंची ब्लूप्रिंट तयार करु. त्यानंतर या वस्तूच्या बांधकामाचा शुभारंभ केला जाईल. त्यामुळे हे काम पूर्ण होऊन समारंभ होण्यासाठी किमान महिन्याभराचा कालावधी लागेल,” असं शोएब म्हणाले.
“कोणत्याही विचारसरणीच्या उलेमांनी (धर्मगुरु) मशीदीच्या बांधकामाची सुरुवात भूमिपूजनाने होत नाही. त्यामुळे अशा कार्यक्रमाचे आयोजन करणं आणि त्यासाठी एखाद्याला आमंत्रित करण्यामध्ये काहीच अर्थ नाही,” असं मत इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे प्रवक्ते अथर हुसैन यांनी व्यक्त केलं आहे. याच फाऊंडेशनकडे या जमिनीवर मशीद आणि इतर सेवा उभारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हुसैन यांनी दिलेल्या माहितीवरुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तरी ते केवळ लोकउपयोगी प्रकल्पांच्या पायाभरणीच्या कार्यक्रम असेल हे स्पष्ट झालं आहे.
दैनीपूर परिसरामध्ये आम्ही मशिदीच्या आजूबाजूला समाज उपयोगी वास्तू उभारत आहोत. या वास्तूंचा उत्तर प्रदेशमधील लोकांना नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाला आम्ही मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करु इच्छितो,” असं हुसैन म्हणाले आहेत. याचप्रमाणे बोर्डाकडून माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याबरोबरच इतर काही मान्यवरांना आमंत्रित करण्याची शक्यता आहे. बोर्डाच्या बैठकीमध्ये कोणकोणाला आमंत्रण द्यायाचे याचा निर्णय घेतला जाणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”