कनेक्टिव्हिटी मध्ये सुपर ! सुविधांमध्ये अव्वल ! तब्बल 34 वर्षानंतर मुंबईला मिळणार नवीन टर्मिनस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबईकरांसाठी एक दिलासादायक आणि ऐतिहासिक टप्पा गाठणारी बातमी समोर आली आहे. तब्बल ३४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहरात एक नवीन रेल्वे टर्मिनस उभारण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेवरील ‘नवीन जोगेश्वरी टर्मिनस’ लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. 1991 मध्ये बांधण्यात आलेल्या कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसनंतर मुंबईत हे पहिलं नविन टर्मिनस असणार आहे.

वांद्रे, दादर आणि मुंबई सेंट्रलवरील ताण होणार कमी

मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे, दादर आणि मुंबई सेंट्रल टर्मिनसवरील वाढता ताण लक्षात घेता नवीन जोगेश्वरी टर्मिनसची निर्मिती अत्यंत आवश्यक ठरली होती. हा टर्मिनस उभारण्यात येत असल्याने या तिघांवरील तांत्रिक व प्रवासी दडपण निश्चितच कमी होणार आहे.

कुठे असेल नवीन टर्मिनस?

नवीन जोगेश्वरी टर्मिनस हे जोगेश्वरी आणि राम मंदिर या दोन स्थानकांच्या मध्ये असणार आहे. त्यामुळे या दोन्ही स्थानकांच्या परिसरातील नागरिकांना थेट लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे.

खर्च आणि रचना

या प्रकल्पासाठी 76.84 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. टर्मिनसवर तीन प्लॅटफॉर्म असणार आहेत, त्यापैकी एक आयलंड प्लॅटफॉर्म, एक होम प्लॅटफॉर्म असून दोन्ही प्लॅटफॉर्मची लांबी 600 मीटर इतकी असेल.

  • प्लॅटफॉर्म 2 आणि 3 पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहेत, तर प्लॅटफॉर्म 1 नंतर सुरू होईल.
  • टर्मिनसवर एकावेळी २४ डब्यांच्या गाड्या थांबू शकतात.
  • दररोज १२ मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना येथे थांबा दिला जाऊ शकतो.
  • दोन बर्थिंग लाईन्स आणि शंटिंगसाठी एक अतिरिक्त लाईन देखील असणार आहे.
  • पाण्याच्या सोयीमुळे प्लॅटफॉर्म-रिटर्न सेवा मोठ्या देखभालीशिवाय शक्य होणार आहे. पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी

अत्याधुनिक पायाभूत सुविधा

  • ऑपरेशनल विभाग आणि रिले रूमसाठी ग्राउंड+2 इमारत
  • राम मंदिर स्टेशनला जोडणारा 6 मीटर रुंद फूट ओव्हरब्रिज, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग प्रवाशांसाठी एस्केलेटर व लिफ्टसह
  • सर्व तीन प्लॅटफॉर्मना जोडणारा 12 मीटर रुंद फूट ओव्हरब्रिज
  • ग्राउंड+3 प्रवासी स्टेशन इमारत
  • AC व्हीआयपी व जनरल वेटिंग लाउंज (स्वच्छतागृह, मोबाईल चार्जिंग, पँट्रीसह)
  • 4 AC आणि 4 Non-AC डबल-बेड रिटायरिंग रूम
  • प्रत्येकी 6 बेडसह प्रवासी वसतिगृह
  • फूड प्लाझा, मनोरंजन क्षेत्र आणि हमालांसाठी विश्रांती कक्ष

वाहतूक आणि पोहोच

या स्टेशनसाठी विशेष वाहतूक सुविधा उभारण्यात येत आहेत:

  • ओला/उबर, टॅक्सी व ऑटो-रिक्षांसाठी स्वतंत्र पिकअप आणि ड्रॉप झोन
  • पार्किंग सुविधा, व्हीआयपी बे आणि ईव्ही चार्जिंग पॉइंट्स
  • टर्मिनस पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडलेला असून, जवळचं मेट्रो स्टेशन फक्त ५०० मीटर अंतरावर असणार आहे

मुंबईच्या जलद आणि सुरक्षित प्रवासासाठी नवीन जोगेश्वरी टर्मिनस एक मोठं पाऊल ठरणार आहे. यामुळे केवळ रेल्वेवरील ताणच कमी होणार नाही, तर मुंबईच्या पश्चिम उपनगरातील लाखो प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. येत्या काही महिन्यांत हे टर्मिनस प्रवाशांच्या सेवेसाठी खुले होण्याची शक्यता आहे. ह्या विकासामुळे मुंबईच्या रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार यात शंका नाही.