ईश्वरपूरच्या नामकरणासाठी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मैदानात, नामकरणास दिला पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर करावे, या मागणीचे लोन जिल्ह्यात पसरले असून त्याला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या श्रीशिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने या नामकरणाच्या लढ्यात उडी घेऊन नामकरणास आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. या मागणीची तत्काळ दखल घेऊन नामकरण करावे, अन्यथा राज्यात मोठे आंदोलन उभारू, असा इशारा युवा हिंदुस्थानने शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, आपल्या देशावर अनेक परकीय आक्रमकांनी आक्रमणे करून देशाची लूट केली. मंदिरे उद्ध्वस्त केली, सक्तीने धर्मातरण केले. आपल्या देशातील शहरांची नावे बदलली आज त्याच आक्रमकांच्या नावाने आपल्या देशात विविध गावे व शहरे आहेत. त्या परकियांच्या खुना मिटल्या गेल्या पाहिजेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूरचे ईश्वरपूर असे नामकरण केले होते. पण शासनस्तरावर ईश्वरपूर असे अद्यापही नामकरण झाले नाही. सध्या हे नामांतरण करण्या संदर्भात शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने आंदोलन सुरू आहे.

या मागणीस तेथील स्थानिक नागरिकांचा उस्फूर्त पाठिंबा मिळत आहे. ईश्वरपूर नामंतरणासाठी आम्हीही 2015 साली मागणी केली होती, या नामांतरणाच्या मागणीला आम्ही श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने जाहीर पाठिंबा देत असल्याचे संघटनेने निवेदनाद्वारे जाहीर केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णयानुसार राज्यातील जातिवाचक उल्लेख असलेल्या गावांची नावे बदलण्यात यावीत या आनुषंगाणे इस्लामपूरचेही नाव बदलून ईश्वरपूर ठेवावे. जर लवकरात लवकर ईश्वरपूर हे नामकरण झाले नाही तर आम्ही श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार आंदोलन करू, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

Leave a Comment