व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची होणार सुटका; सुप्रीम कोर्टाचा आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुप्रीम कोर्टात आज भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणातील नलिनी आणि आर. पी. रविचंद्रन यांच्यासह सहा जणांच्या सुटकेचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयात आज महत्वाची सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने त्यांना मुक्त करण्याचे आदेश दिले. या दोषी आरोपींवर जर अन्य कुठलाही खटला नसेल तर त्यांना मुक्त करण्यात यावे, असे कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले.

नलिनी, रविचंद्रन, मुरुगन, संथन, जयकुमार आणि रॉबर्ट पायस यांना राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या सर्व आरोपींच्या सुटकेबाबत पार पडलेल्या सुनावणीत अगोदर पेरारिवलन याला मुक्त करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने तुरुंगातील चांगल्या वर्तणुकीमुळे 18 मे रोजी पेरारिवलन याला मुक्त करण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती एल. नागेश्वर यांच्या खंडपीठाने कलम 142 चा वापर करून हा आदेश दिला होता.

राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तामिळनाडूतील श्रीपेराम्बदूर येथे एका प्रचार सभेदरम्यान आत्मघाती हल्ला करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पेरारिवलन याच्यासह ७ जणांना दोषी ठरवत अटक करण्यात आली होती. त्यानंतर टाडा कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने पेरारिवलन याला फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र नंतर कोर्टाने दया याचिकेवरील निर्णयाला उशीर झाल्याचा आधार घेत पेरारिवलनला सुनावलेली फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये बदलली होती. दरम्यान आता राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील सहा जणांची सुटका करण्यात आली आहे.

कोण आहे एजी पेरारिवलन?

एजी पेरारिवलन हा तामिळनाडूतील जोलारपेट शहरातील रहिवासी आहेत. त्याला 11 जून 1991 रोजी राजीव गांधी हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. जेव्हा त्याला पकडण्यात आल तेव्हा त्याचं वय फक्त 19 वर्ष होतं. त्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा केला होता. पुढील शिक्षणासाठी तो चेन्नईला आला. त्याचवेळी राजीव गांधी हत्येत सामील असलेल्या लोकांमध्ये त्यांचे नाव पुढे आले आणि त्याला अटक करण्यात आली.