हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना भवन आणि पक्षनिधी शिंदे गटाला देण्यात यावी अशा प्रकारची याचिका काही दिवसांपूर्वी सर्वोच्य न्यायालयात दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. आज याबाबत कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने सदर वकिलाची याचिका तर फेटाळून लावलीच आणि उलट वकिलांना खडेबोलही सुनावले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर पक्षाचा निधी आणि शिवसेना भवन शिंदेंना देण्यात यावं अशा प्रकारची याचिका अॅड. आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. आज त्यावर सुनावणी होती. यावेळी कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत गिरी यांना चांगलच फटकारलं आहे. शिंदेंना संपत्ती द्यावी अशी मागणी करणारे तुम्ही कोण? असा सवाल करत कोर्टाने वकिलांना खडेबोल सुनावले आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे याना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं असले तरी शिवसेना भवन आणि पक्षाचा निधी ठाकरे गटाकडेच राहणार हे आता स्पष्ट झालं आहे. आणि या संपूर्ण प्रकरणावर एकप्रकारे पडदा पडला आहे. दरम्यान, आपण कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही असे वकील गिरी यांनी यापूर्वीच सांगितले होते.