हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी (Baramati Loksabha Constituency) मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आज सकाळी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या शरद पवारांच्यासोबत काटेवाडीतील मतदान केंद्रावर दाखल झाल्या होत्या. यानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवार यांच्या निवासस्थानी गेल्या असल्याचे वृत्त समोर आले आहे. याठिकाणी त्या 5 मिनिटे थांबल्या आणि त्यानंतर त्या निघून गेल्या. पुढे त्यांनी माध्यमांशी ही संवाद साधला.
अजितदादांच्या घरी जाण्याचे कारण काय??
मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या निवासस्थानी ठीक 11 वाजता दाखल झाल्या होत्या. तेव्हा अजित पवार ही घरीच होते. परंतु सुनेत्रा पवार घरी नव्हत्या. सुप्रिया सुळे या अजितदादांच्या घरी काकींची भेट घेण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेल्या होत्या. अजितदादांच्या निवासस्थानी गेल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी काकी आशाताई पवार यांची भेट घेतली. त्यांच्याशी पाच मिनिटे संवाद साधला. पुढे त्या इतर कोणाचीही भेट न घेता घराच्या बाहेर पडल्या.
दरम्यान, या भेटीसंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, “मी आशा काकी यांना नमस्कार करण्यासाठी आले होते. घरात फक्त मी आणि काकीच होतो. मी फक्त काकींची भेट घेतली. हे माझ्या काका, काकींचे घर आहे. माझ्या आयुष्यातील लहाणपण याच घरात गेले आहे. मी या घरात दोन- दोन महिने राहिले आहे. त्यावेळी दोन-दोन महिने माझ्या आईशी बोलणे होत नव्हते. जेवढे माझ्या आईंनी माझे केले नाही, तेवढे माझ्या सर्व काकींनी माझ्यासाठी केले”