परंपरेच्या बाजारात अक्कल..; भिडेंच्या ‘त्या’ विधानाचा सुप्रिया सुळेंकडून समाचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । एका महिला पत्रकाराशी बोलताना कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,असं विधान शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष भिडे गुरुजी यांनी केल्यानंतर पुनः एकदा ते टीकाकारांचे लक्ष्य बनले आहेत. भिडे गुरुजी यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे. आपल्या अधिकृत फेसबुक अकॉउंट वरून हेरंब कुलकर्णी यांची कविता शेअर केली आहे.

पहा सुप्रिया सुळेंनी शेअर केलेली कविता –

तू आणि मी ….????

मी लावतो टिळा
तू लाव टिकली
परंपरेच्या बाजारात
अक्कल आम्ही विकली

मी लावतो भस्म
तू लाव कुंकू
गुलामीचा शंख
दोघे मिळून फुंकू

तू घाल मंगळसूत्र
मी घालतो माळ
मनूने मारलेली रेषा
मनोभावे पाळ

तू घाल बांगड्या
माझ्या हातात गंडा
मुकाट्याने ऐक नाहीतर
आमच्या हातात दंडा

मी घालतो मोजडी
तू जोडवे घाल
सप्तपदी च्या मर्यादेत
जन्मभर चाल

तू घाल अंबाडा
मी शेंडी राखतो
विज्ञानाच्या प्रगतीला
परंपरेने झाकतो

मी घालतो टोपी
तू घाल बुरखा
बायकांच्या गुलामीवर दोन्हीकडे
एकमत आहे बर का…!!!

मी धोतरात, तू शालूत
होऊ परंपरेचे दास
साने गुरुजी ते भिडे गुरुजी
महाराष्ट्राचा प्रवास …..!!!!!

हेरंब कुलकर्णी

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02enLphYZLbEVLYfgeME7H5tq3gZZV1G7yQpgv4JPkEFcJEHYu9WKEaa1VGBKY4sF1l&id=100044093303263

भिडे गुरुजी नेमकं काय म्हणाले होते-

संभाजी भिडे हे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला मंत्रालयात गेले होते. त्यानंतर एका महिला पत्रकाराशी बोलताना आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली. त्यांच्या या विधानावर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. येव्हडच नव्हे तर राज्य महिला आयोगने भिडे गुरुजींना नोटीस दिली आहे. भिडे गुरुजी यांनी यापूर्वीही महिलांना हीन समजणारी, वक्तव्य केली आहेत त्यांची मनोवृत्ती यातून दिसून येते. टिकली ही महिलेच्या कर्तृत्वाच मोजमाप नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा, असं महिला आयोगानं म्हटलं आहे.