कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोनाच्या पहिल्या लाटेत भयावह परिस्थितीत रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा करायचा असो की दुसऱ्या लाटेत भुकेल्यांना प्रेमाचे दोन घास जेवण द्यायचे. झोपडपट्टी, रोजदारी बंद असलेल्या कुटुंबाच्या रोजीरोटीसाठी मलकापूर शहरातील एकच अवलिया रात्र- दिवस धावत आहे. या गरजू लोकांच्या आयुष्यात एक छोटासा आशेचा सुरज निर्माण करणाऱ्या अवलियाचे नांव सुरज शेवाळे असे आहे.
मलकापूर येथील या अवलियाने ऑक्सिजन पुरवठा करुन एका- दोघाला नव्हे तर तब्बल 112 रुग्णांना पदरमोड करून घरपोच ऑक्सिजन लावून अनेकांचे प्राण वाचवले आहेत. रात्री-अपरात्री प्रत्येकाच्या हाकेला साथ देत त्यांच्या जीवनामध्ये नव्याने सुरज उगवणाऱ्या सुरज शेवाळे यांचे परिसरात कौतुक होत आहेत.
मलकापूर किंवा कराडच नव्हे तर परिसरातील कुणीही आणि कुठेही बोलवले तर रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी सुरज धडपडत असतो. भाजपचे मलकापूर शहराध्यक्ष म्हणून ते काम करत करतात. कृष्णा रुग्णालयाच्या सहकार्याने त्यांचे हे कार्य सुरु आहे. अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक असल्याने सूरजने ओळखीचा फायदा ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू लोकांना बेड मिळवून देण्यासाठी केला. तब्बल 70 रुग्णांना बेड उपलब्ध करून दिला.
कोरोना काळात विनायक भोसले मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी
कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात नातेवाइकांची व जेवणा अभावी दयनीय अवस्था होत असते. त्यासाठी त्यांनी रुग्णालयाबाहेर मोफत जेवण मिळेल असे फलक लावले. त्या माध्यमातून महिनाभरापासून सकाळ-संध्याकाळी रोज 12 डबे रुग्णांना पोहोचवून त्यांची भूक भागवत असतात. आगाशिवनगर, मलकापूर परीसरातील गरजू लोकांना विनायक भोसले मित्र परीवाराच्या वतीने 200 किलो गहू आणि तांदूळ घरपोच दिले आहे. केवळ सामाजिक बांधिलकी म्हणूनच हे काम करत असल्याचे ते सांगत असतात.