गडचिरोली : बेकायदेशीर खाणविरोधात प्रचंड जनसमुदाय गोळा होत असल्याने प्रशासन हादरले आणि एकतर्फी निर्णय घेत आंदोलनातील प्रमुख नेत्यांना अचानक स्थानबद्ध केले. हे करतांना त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य नाकारून मानसिक छळ केला आणि चुकीच्या पध्दतीने कार्यवाही केली. या विरोधात लवकरच कायदेशीर बाबी तपासून उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे आंदोलनातील एक प्रमुख नेते रामदास जराते यांनी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
ते पुढे म्हणाले की जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बारा मिनिट्यांच्या चर्चेत मुद्यांची सोडवणूक न करता केवळ निवेदने पुढे पाठविण्याची प्रक्रिया होत असल्यामुळे आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. दरम्यान स्थानिक प्रशासनाने लाउड स्पीकरच्या नाकारलेल्या परवानगीवर अनुसुचित जमाती आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे लेखी दिल्यामुळे संतापलेल्या प्रशासनाने वचपा काढत आंदोलनातील नेत्यांना झोपेतून उठवून उचलून नेले व आंदोलन उधळून लावले असे जराते यांनी सांगितले.
सर्व स्थानबद्धांना विविध कारणांनी दिवसभर बसवून ठेवले, त्यांचे कपडे व चपला सुध्दा घालू दिल्या नाहीत, मोबाईल सुध्दा हिसकवून घेऊन गेले आणि रात्री ९ वाजता त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले. दिवसभरात शिला गोटा यांची तब्येत खालावली तरीही त्यांची साधी विचारपूसही केली गेली नाही. हे आंदोलनकर्त्यांच्या मानवी अधिकाऱ्यांचे हनन असल्यामुळे प्रशासनाच्या कृतीचा निषेध करीत याविरूध्द उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. खाण विरोधी आंदोलन हे दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर मोठे होऊ नये याकरिता उधळण्यात आल्याचा आरोप माकपचे जिल्हा महासचिव अमोल मारकवार यांनी केला. तर रोजगाराच्या नावावर खाण समर्थक फसवणूक करत असल्याचे एड लालसू नागोटी यांनी पत्रकारांना सांगितले.
पत्रकार परिषदेला शेकाप नेते रामदास जराते, माकप चे जिल्हा महासचिव अमोल मारकवार, भामरागड पट्टी इलाका प्रमुख जिप सदस्य एड लालसू नागोटी, जि.प सदस्य क्रांती केरामी, भामरागड पं.स सभापती कोडापे, संजय वाकडे, सपना रामटेके, परमेश्वर गावडे हे उपस्थित होते.