मुंबई । अभिनेता सुशांतसिंहच्या आत्महत्येच्या तपासावरून सातत्यानं मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शेलक्या शब्दांत टीका केली आहे. “भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे”, अशा शब्दात सचिन सावंत यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. याशिवाय ‘बिहार निवडणुकीच्या राजकारणापायी तेथील पोलिसांचं गुणगाण करून मुंबई पोलिसांना बदनाम करणाऱ्या भाजप नेत्यांचा महाराष्ट्रद्रोह उठून दिसत आहे,’ अशी घणाघाती टीकाही सावंत यांनी केली आहे.
सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणात बिहारमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहारमधील राजकीय नेत्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित केली होती. त्यापाठोपाठ महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांनीही मुंबई पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आक्रमक झालेल्या भाजपला आता शिवसेनेबरोबरच काँग्रस, राष्ट्रवादीनंही उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. सत्यजित तांबे आणि रोहित पवार या युवा नेत्यानंतर आता प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केलं आहे. ‘बिहार निवडणुकीच्या राजकारणासाठी भाजपचे महाराष्ट्रातील नेते तिथल्या पोलिसांचे गुणगान करून मुंबई पोलिसांना बदनाम करत आहेत. यातून त्यांचा महाराष्ट्र द्रोह उठून दिसत आहे. ही मंडळी अत्यंत खालच्या पातळीवर उतरू शकतात. भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे,’ अशी खरमरीत टीका सावंत यांनी केली आहे.
बिहार निवडणूकीसाठी राजकारण करण्याकरिता बिहार पोलिसांचे गुणगान करुन @MumbaiPolice ला बदनाम करण्याच प्रयत्न करणाऱ्या @BJP4Maharashtra च्या नेत्यांचा महाराष्ट्र द्रोह हा उठून दिसत आहे. ही मंडळी अत्यंत खालच्या पातळीवर उतरू शकतात. भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 7, 2020
सुरुवातीला बॉलिवूडमधील आरोप-प्रत्यारोपांपुरते मर्यादित असलेल्या सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाला आता पुरते राजकीय वळण आले आहे. भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना यात ओढून सीबीआय चौकशीची मागणी सातत्यानं लावून धरली होती. बिहार सरकारनंही या प्रकरणात रस दाखवत परस्पर सीबीआय चौकशीची शिफारस केली. बिहारचे पोलीस अनेकदा तपासासाठी मुंबईत येऊन गेले. भाजपचे नेते रोजच्या रोज वेगवेगळे आरोप करत आहेत. मुंबई पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप करत आहेत. त्यानंतर बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या तपासाविषयी आरोप केले. त्यापाठोपाठ भाजप नेत्यांनीही मुंबई पोलिसांना तपासावरून लक्ष्य केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”