मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर संशयाची वावटळ उठली असतानाच या सर्वाच्या केंद्रस्थानी असलेली सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची कसून चौकशी करण्यात येत आहे. सीबीआय आणि ईडी या दोन तपास यंत्रणांकडून याप्रकरणी तपास सुरू झाला असून काल ईडीने तब्बल साडेआठ तास रियावर प्रश्नांचा भडीमार केला. या चौकशीत रियानं तिच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले असून सुशांतच्या कुटुंबियावर गंभीर आरोप केले आहेत.
सुशांतच्या कुटुंबियांना त्याच्या विम्याचे पैसे हवे आहेत, त्यामुळं त्यांनी माझ्यावर खोटे आरोप करत खटला दाखल केला असं, रियानं म्हटलं असल्याची माहिती आहे. तसंच माझं आणि सुशांतचं नातं त्याच्या घरच्यांना मान्य नव्हतं. पण सुशांतला माझ्यासोबतचं नातं तोडायचं नव्हत. त्यामुळं त्यानं त्याच्या कुटुंबियांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता, असं रियानं म्हटलं आहे.
सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात पाटणा पोलिसांनी रिया चक्रवर्ती व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्याच्या आधारे ईडीनं काल मनी लॉन्डरिंग प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. काल चौकशीच्या पहिल्या फेरीत रियासह तिचा भाऊ शौविक, वडील तसेच सुशांतची पूर्वाश्रमीची मॅनेजर श्रृती मोदी यांचीही चौकशी करण्यात आली. ८ तासांच्या चौकशीनंतर हे सर्वजण ईडी कार्यालयातून बाहेर आले तेव्हा माध्यमांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, ही विनंती घेऊन रियानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने रियाचा विनंती अर्ज फेटाळला. त्यामुळेच ईडीकडून आधीच बजावण्यात आलेल्या समन्सनुसार रियाला ईडीचे कार्यालय आज गाठावे लागले