नवी दिल्ली | भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांनी सुशील चंद्रा यांचे नाव देशाचे चोविसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवडून त्यांची नेमणूक केली आहे. सुशील चंद्रा हे आपल्या पदाचा पदभार आज स्वीकारतील.
सुनील अरोरा यांच्याकडे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी होती. ते आता सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे सुशील चंद्रा यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. नवीन आयुक्तांचा कार्यकाळ हा 14 मे 2022 पर्यंत असणार आहे. त्यांच्या आगामी कार्यकाळामध्ये पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्यातील निवडणुका पार पडणार आहेत.
सुशील चंद्रा हे भारतीय महसूल सेवेतील 1980 बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी देशातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांवरून आपल्या कार्यकाळात देशसेवा केली आहे. 14 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांना निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. देशातील सद्ध्य परिस्थिती पाहता निवडणुकीचे नियोजन करणे ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.