न्युयाॅर्क | पाकिस्तान दहशतवाद पोसण्यात आणि तो पसरवण्यात जसा पटाईत आहे तसाच ‘तो मी नव्हेच’ असे सांगण्यातही चांगलाच पटाईत आहे, अशी तोफ सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्टसंघात डागली. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या, निष्पापांचे बळी घेणाऱ्यांचा गौरव करणाऱ्या पाकशी चर्चा कशी करणार, असा थेट सवालही स्वराज यांनी केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७३ व्या आमसभेत त्या बोलत होत्या. यावेळी दहशतवादाच्या मुद्द्यावरून स्वराज यांनी पाकिस्तानवर जोरदार शब्दांत हल्ला चढवला.
पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी नंदनवन असून 26/11 च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड उघड माथ्याने हिंडत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘9/11 चा न्युयॉर्कवरील हल्ला आणि 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांनी शांततेच्या प्रयत्नांना खीळ घातली आहे. भारत दहशवादामुळे त्रस्त असून शेजारील देशच याला खतपाणी घालत आहेत’, असा आरोपही त्यांनी केला. प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या कृत्यांमुळे शांतता चर्चा खंडीत झाली असल्याचे त्या म्हणाल्या.
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासमोर ठेवलेल्या प्रस्तावावर आम्ही चर्चेसाठी होतो. मात्र, पाकिस्तानने भारताच्या तीन जवानांचे अपहरण करुन दोघांची हत्या केली. यामुळे भारताने पाकिस्तानला नकार दिल्याचे, सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले.
चर्चेच्या मार्गाने वाद मिटवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला मात्र प्रत्येकवेळी पाकने त्यात खोडा घातला. पाकच्या नापाक करणीमुळेच चर्चा थांबलेली आहे, असे सुषमा म्हणाल्या. पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांनी पाठवलेल्या चर्चेच्या प्रस्तावावरही सुषमा यांनी भूमिका स्पष्ट केली. एकीकडे पाकचे पंतप्रधान चर्चेसाठी आवाहन करतात आणि दुसरीकडे तीन भारतीय जवानांचे अपहरण करून त्यातील एका जवानाची निर्घृण हत्या करण्यात येते, यातच सगळे काही स्पष्ट होते, असे सुषमा म्हणाल्या. इस्लामाबाद दौऱ्यानंतर झालेल्या पठाणकोट हल्ल्याचा उल्लेखही सुषमा यांनी केला.