लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील झांसीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झांसीमध्ये एका नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला आहे. ती एका खासगी रुग्णालयातुन नाईट ड्यूटी संपवून मैत्रिणीसोबत घरी परतली होती. यानंतर मैत्रिणीला ती बेडवर बेशुद्ध अवस्थेत दिसली. तिच्या शेजारी एक सिरिंज आणि एक इंजेक्शन पडले होते. यामुळेच तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. मृत विद्यार्थिनीचे नाव रोशनी असे होते. ती सतनाच्या सार्थक नर्सिंग कॉलेजमधून जीएनएम करीत होती. तिच्यासोबत एक मैत्रिणदेखील राहत होती. दोघी शिक्षणासह दोन वर्षांपासून सरोज रुग्णालयात नोकरी करीत होत्या आणि गुमनाबारास्थित रुग्णालयाच्या क्वार्टरमध्ये एका खोलीत राहत होत्या.
रोशनीची मैत्रीण पूनमने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री रुग्णालयात नाइट ड्यूटी होती. त्यामुळे सोमवारी सकाळी 10.30 वाजता दोघे ड्यूटी करून खोलीवर आलो. ड्यूटीहून परतल्यानंतर तिने रोशनीला चहा किंवा दूध पिण्यासाठी विचारले मात्र रोशनीने त्यावेळी नकार दिला. त्यानंतर पूनम दूध पिऊन अंघोळीला निघून गेली. ती पुन्हा आली तर रोशनी बेडवर झोपली होती. यानंतर तिने रोशनीला जेवणाबद्दल विचारलं, मात्र तिने काहीच उत्तर दिलं नाही. पुनमने पुन्हा पाहिलं तर ती बेशुद्ध अवस्थेत होती. त्यानंतर तिने रुग्णालयात डॉक्टरांना कॉल केला.
यानंतर रोशनीला तातडीने मेडिकल कॉलेजच्या आपात्कालीन विभागात भरती करण्यात आले. ती नेमकी बेशुद्ध कशामुळे झाली याचा शोध घेण्यासाठी तिच्या खोलीची तपासणी केली असता बेडवर एक इंजेक्शन आणि सिरिंज मिळाली. यामुळे उपचारादरम्यान रोशनीचा मृत्यू झाला. पूनमने रोशनीच्या घरी कॉल करून या घटनेची माहिती दिली असता रोशनीचा भाऊ आणि अन्य कुटुंबीय तातडीने रुग्णालयात दाखल झाले. विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.