औरंगाबाद | जिल्ह्यातील बेकायदेशीर फार्महाऊस असल्याचा संशय प्रशासनाला आला आहे. याप्रकरणी प्रशासनाकडून तलाठ्यांना सर्वेक्षणाचा आदेश देण्यात आला आहे. फार्महाऊस बांधण्यासाठी ‘महसूल एनए’ यापैकी कोणतीही परवानगी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बांधकामासाठी ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक असते. परंतु विनापरवानगी दहा हजारांपेक्षा जास्त फार्महाउस असल्याचा संशय प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
मागील महिन्यात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी एका फार्महाऊसवर कोरोनाचे नियम फेटाळून लावत कव्वालीचा कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमामध्ये खासदार इम्तियाज जलील हे देखील उपस्थित होते. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात फार्महाऊसचे बांधकाम आणि उद्देश तपासण्याची मोहीम सुरू केली आहे. खुलताबाद, पैठण, सोयगाव, सिल्लोड, औरंगाबाद तालुक्यात भरपूर फार्म हाऊस असून ते व्यावसायिक उद्देशाने वापरण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
फार्म हाऊस बांधण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर कुठेही परवानगी घेतल्याचे आढळलेले नाही. काहीजणांनी या फार्महाऊसचा वापर पर्यटनासाठी केल्याचे दिसून येत आहे. या फार्महाऊस चा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी लागेल. त्यांनी एन ए त्या प्रादेशिक विकास आराखड्याचा विचार करून बांधकाम केले नसेल तर त्यांना दंड भरावा लागेल असे अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी सांगितले.